मुंबई – नरेंद्र मोदींनी आज संध्याकाळी ७.१५ वाजता देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागा मिळाल्या आहेत. तर भाजपासह एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत. या बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. या शपथविधीत काही जणांचा पत्ता कट झाला आहे तर काही जणांना नव्याने संधी देण्यात आली आहे. अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळालेलं नाही.
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्या आघाडीकडे बहुमत आहे. पहिल्यांदाच असा आघाडीच्या सरकारचे ते नेते आहेत त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून चांगलं काम करावं अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांना यावेळी अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रिपद का दिलं गेलं नाही? याबाबत विचारलं असता त्यावरही त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी शरद पवारांनाही निमंत्रण आलं होतं. मलाही फोन आला होता, मात्र आज संघटनात्मक बैठक होती आणि उद्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी आणि शरद पवार उपस्थित राहणार नाही असं कळवलं होतं. अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही हे अपेक्षित होतं. मित्र पक्षांशी भाजपा कशी वागते हे मी दहा वर्षे जवळून पाहिलं आहे. मला दुसऱ्यांच्या घरात ढवळाढवळ करायला आवडत नाही. पण यात नवल वाटण्याचं काहीही कारण नाही. असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवार आणि नरेंद्र मोदींना टोलाच लगावला आहे.