भारत भेटीने अचंबित झालो; चिली राष्ट्राध्यक्षांची भावना

0

मुंबई : भारताबद्दल फार पूर्वीपासून कुतूहल होते व मुंबईबद्दल अनेक पुस्तकांच्या माध्यमातून वाचले होते. प्रत्यक्ष होत असलेल्या भारत भेटीमुळे आपण अक्षरशः अचंबित झालो आहो. मात्र, येथील संस्कृति आणि लोकजीवन वरवर न पाहता लोकांमध्ये राहून अनुभवायचे आहे, असे उद्गार सध्या भारत भेटीवर असलेले चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरीच फॉन्ट यांनी आज येथे काढले. महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी (दि.३ एप्रिल) ३९ वर्षीय राष्ट्राध्यक्ष बोरीच यांचे राजभवन येथे स्वागत केले त्यावेळी ते बोलत होते.

नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोबत चिलीचा ‘सामायिक आर्थिक भागीदारी करार’ झाला असून व्यापार व वाणिज्य याशिवाय आपला देश भारताशी कृषी उद्योग, संस्कृती, महत्वपूर्ण खनिज आणि विशेष करून चित्रपट निर्मितीमध्ये सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे राष्ट्राध्यक्ष बोरीच यांनी यावेळी राज्यपालांना सांगितले. चिलीशी व्यापार वाढल्यास भारताला चिली देशाचा दक्षिण अमेरिकी देशांसाठी प्रवेशद्वार म्हणून उपयोग करता येईल, असे राष्ट्राध्यक्ष बोरीच यांनी सांगितले.

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण स्पेन येथे झाल्यानंतर त्या देशातील पर्यटनाला मोठी चालना मिळाली होती, असे नमूद करून भारतीय चित्रपट उद्योगाने चिली सोबत चित्रपट सहनिर्मिती करावी आणि चिली येथे चित्रपटांचे चित्रीकरण करावे, अशी अपेक्षा राष्ट्राध्यक्षांनी यावेळी व्यक्त केली. चिली येथे चित्रीकरणासाठी फार सुंदर ठिकाणे उपलब्ध असून त्यामुळे चिलीतील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी बोरीच यांनी राज्यपालांकडून राज्याच्या तसेच मुंबईच्या नागरी समस्या समजून घेतल्या तसेच त्यावर शासनातर्फे केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. चिलीच्या राष्ट्राध्यक्षांचे राज्यात स्वागत करताना राज्यपालांनी पर्यटन व व्यापार यांच्या माध्यमातूनच उभय देशांमधील संबंध अधिक दृढ होतील, असे सांगितले. सध्या मुंबई आणि चिली मध्ये थेट विमानसेवा उपलब्ध नसली तरी देखील नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ विमान तयार झाल्यानंतर उभय देशांमध्ये थेट विमान सेवा सुरू होण्याबद्दल चर्चा करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी चिलीचे परराष्ट्र मंत्री अल्बर्टो व्हॅन क्लेव्हरेन, चिलीचे भारतातील राजदूत जुआन अँगुलो, चिलीच्या सांस्कृतिक कार्य मंत्री कॅरोलिना अरेडोंडो व राष्ट्राध्यक्षांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार सल्लागार कार्लोस फिगुएटो हे देखील उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech