ओडिशा : मी आजवर कधीही अल्पसंख्याकांविरोधात भाष्य केलेले नाही. आमच्या पक्षाने आजच नव्हे, तर कधीही अल्पसंख्याकविरोधी कृती केली नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केले. मात्र कोणालाही विशेष नागरिक म्हणून वागणूक देणे मला मान्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. वृत्तसंस्थेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी यांनी केलेली भाषणे वेगवेगळ्या धर्मांत फूट पाडणारी, तसेच धार्मिक ध्रुवीकरणास प्रोत्साहन देणारी आहेत, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. या विधानांमुळे अल्पसंख्याकांच्या मनात संशय निर्माण होत नसेल का, असे विचारले असता त्यांनी ही भूमिका मांडली. मी आजवर कधीही अल्पसंख्याकांविरोधात बोललेलो नाही. मी केवळ काँग्रेसच्या मतपेढीच्या राजकारणावर टीका करत आलो आहे. काँग्रेसकडून नेहमीच राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे उल्लंघन केले गेले आहे, असे ते म्हणाले.
आपल्या देशात धर्माच्या आधारे कोणालाही आरक्षण मिळता कामा नये, असे जवाहरलाल नेहरू, डॉ. आंबेडकर यांनी ठरविले होते. मात्र, आता या तत्त्वाच्या विरोधात काँग्रेस वागत आहे. त्यांचे हे खरे रूप मी सर्वांसमोर आणणारच. घटना समितीत आमच्यापैकी कोणीही नव्हते, हे लक्षात घ्या, असे ते म्हणाले. तरीही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुमच्याकडून अल्पसंख्याकांना लक्ष्य केले गेले नाही का, असे विचारले असता, पंतप्रधान म्हणाले, भाजप कधीही अल्पसंख्याकांच्या विरोधात नव्हता. काँग्रेसने नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण केले, तर मी नेहमी संतुष्टीकरणाच्या मार्गावरून चालत आलो. सब का साथ, सब का विकास हे माझ्या राजकारणाचे सूत्र आहे व त्यात मी धर्माच्या आधारे भेदभाव करत नाही.