तेहरान- इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांची अंत्ययात्रा आज इराणच्या ताब्रिझ शहरातून काढण्यात आली. या अंतयात्रेत लाखोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. यावेळी लोक रईसी यांचे फोटो हातात घेऊन शोक व्यक्त करत होते. राष्ट्रपतींना निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले. तबरीझमधील शोकसभेत इराणचे झेंडेही फडकवण्यात आले. शहरातील अनेक मौलवी आणि इमामही यांनाही शोक आवरता आला नाही. तेहरानमधील शोकसभेला महिलाही उपस्थित होत्या.
राईसींच्या निधनाने इराणमध्ये ५ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. २३ मे रोजी इराणच्या मशहद शहरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या शहरात रईसींचा जन्म झाला होता. रविवारी इराण-अझरबैजान सीमेजवळ रायसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यात परराष्ट्र मंत्री हुसैन अमीराब्दुल्लाहियान यांच्यासह एकूण ९ जण विमानात होते. त्या सर्वांचा या अपघातात मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह काल तबरीझ शहरात आणण्यात आले. राईसींच्या मृत्यूच्या चौकशीचा अहवाल अद्याप आलेला नाही. अझरबैजानचा हा दुर्गम पर्वतीय भाग इस्रायली गुप्तचर संस्था मोसादचा तळ आहे. अझरबैजान हा इराणचा शेजारी देश असून त्यांचे एकमेकांशी तणावाचे संबंध आहेत दरम्यान, इराणमधील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर २८ जून रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी २० जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.