आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत वि. न्यूझीलंड महामुकाबला

0

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना उद्या, ९ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिले आहे. दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात वर्ष २००० नंतर पुन्हा एकदा समोरासमोर उभे राहणार आहेत. भारतीय संघाला १२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. भारतीय संघाने शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकली होती. याआधी २०१७ मध्ये पाकिस्तानने भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंग केले होते, पण यावेळी भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत जेतेपदावर कब्जा करू इच्छिते. पण, भारतासाठी हे सोपे नसेल, कारण आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने नेहमीच भारतासाठी तगडे आव्हान दिले आहे.

दुबईत होणारा महाअंतिम सामना हा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील आणि भारतीय संघाचा एकूण पाचवा सामना असणार आहे. तर न्यूझीलंडचा दुसरा सामना असणार आहे. याआधी भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ २ मार्चला याच मैदानात समोरासमोर आले होते. भारतीय संघाने याआधीचे चार सामने या स्टेडियममधील वेगवेगळ्या पिचवर खेळले होते. या चारही खेळपट्टींवर फिरकी गोलंदाजांना मदत झाली होती. तसेच चार पैकी एका खेळपट्टीकडून फलंदाजांनाही मदत झाली होती. याच खेळपट्टीवर हा अंतिम सामना होणार आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग. न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.

दरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबद्दल ही चिंतेची बाब आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी संघ सराव सत्रादरम्यान एक चेंडू त्याच्या गुडघ्याला लागला. कोहलीला फलंदाजी करताना ही दुखापत झाली. त्यानंतर त्याने सराव थांबवला आणि वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली. भारतीय संघाचे फिजिओ त्याच्या दुखापतीबाबत माहिती घेत असून उपचार करत आहेत. दरम्यान, चेंडू गुडघ्याला लागल्यानंतर कोहलीने सराव केला नाही, पण तो इतर खेळाडूंच्या सरावावर लक्ष ठेवून आहे आणि संघासोबत मैदानावरच थांबला.

अलिकडच्या काळात विराटची तंदुरुस्ती देखील भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे आणि अलिकडेच गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातही खेळू शकलेला नव्हता. अशा परिस्थितीत, ही नवी दुखापत विराटसाठी त्रासदायक ठरू शकते. पण दिलासा देणारी बाब म्हणजे कोहलीची दुखापत फारशी गंभीर नाही. या अहवालात भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचा हवाला देत असे म्हटले आहे की, कोहली अंतिम सामन्यासाठी तंदुरुस्त आहे आणि तो मैदानात नक्की उतरेल.

अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडला तर षटकांची संख्या कमी करून सामना खेळवता येईल. आयसीसीच्या नियमांनुसार, अंतिम सामन्यात किमान २० षटके खेळणे आवश्यक आहे. प्रत्येक संघाला २०-२० षटके दिली जातील. पाऊस पडल्यास नियोजित वेळेनंतर षटके कमी केली जातात. ९ मार्च रोजी दुबईमध्ये पावसाची शक्यता नाही. मात्र जर पावसामुळे हा सामना खेळवता आला नाही, तर तो १० मार्चला राखीव दिवशी खेळवला जाईल. २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि श्रीलंका अंतिम फेरीत पोहोचले होते. त्यावेळी दोन्ही दिवशी सामना होऊ शकला नव्हता. त्यानंतर आयसीसीच्या नियमांनुसार दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. जर पाऊस पडला तर यावेळीही असेच काहीसे घडू शकते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech