पुणे : संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये तपास यंत्रणांवर दबाव येत आहे, असा आरोप करत मंत्री धनंजय मुंडे याचा राजीनामा मागण्यात येत आहे. यावेळी पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, कुठल्याही चौकशीमध्ये उद्या तुमच्यावरही आरोप होईल, तुम्ही अमूक अमूक केसमध्ये दोषी आहात. आता एसआटी, सीआयडी, न्यायाधीशांची चौकशी सुरु आहे. त्याच्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, जो कोणी दोषी असेल तो तिथं सिद्ध झालं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात मीदेखील देवेंद्रजींना भेटून सांगितलं आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, या संदर्भात पक्ष वगैरे न बघता वरिष्ठ पातळीवर काम करणारे व्यक्ती दोषी असतील तर कुणाचीही गय करण्याचं काम नाही. मुख्यमंत्री म्हणाले मीही त्याच मताचा आहे. प्रत्येकाची चौकशी करुन कुणाकुणाला फोन झाले, किती वेळ बोलणं झालं, हे सगळं समजणार आहे. अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात खपवून घेणार नाही. सरकारने यात गांभीर्याने लक्ष घातलेलं आहे. कुणाला काय बोलायचं याचा अधिकार संविधानाने दिला आहे. असं करताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. सत्ताधारी आमदारांसह विरोधी पक्षातील आमदार, नेत्यांनी अशी मागणी केली आहे. या प्रकरणावरुन मागच्या दोन आठवड्यांपासून शांत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी बोलले.