भारताला आर्थिक महासत्ता करायचं असेल तर गाव-खेड्यांचा विकास महत्वाचा – नितीन गडकरी

0

मुंबई :  भारताला जागतिक महासत्ता बनवायचं असेल तर देशभरातल्या छोट्या गावांचा, पाड्यांटा विकास झाला पाहीजे. इथे शिक्षण पोहोचलं पाहीजे. याचसाठी कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या या कामाचा पाया एक लाख शिक्षणबाह्य मुलांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदीर इथे आयोजित करण्यात आलेल्या कर्मयोगी पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. विदर्भातल्या ७ जिल्ह्यात कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था १०३२ एकलव्य एक शिक्षकी शाळांच्या माध्यमातून ३० हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या २९ वर्षांपासून काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामविकास, विविध शासकीय योजना सोकांपर्यंत पोहोचवणं, कौशल्य विकास आणि थेट नोकरी-व्यवसायासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. या शाळांमध्ये शिकवणाऱ्या चौर शिक्षकांचा यावेळी तर सत्कार करण्यात आला. तर गेल्या २० वर्षांपासून एक शिक्षकी शाळांसाठी नोकरी सोडून काम करणाऱ्या प्रशांत बोपर्डीकर यांना केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कर्मयोगी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी अभिनेते सुनील शेट्टी, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक गिरीष कुबेर, विख्यात शल्य विशारद डॉ. पांडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गडचिरोलीमध्ये शिक्षणाच्या बरोबरच कौशल्यविकासाचं प्रशिक्षण तरुणांना देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. मी राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना गडचिरोलीत रस्ते बनवतांना वनविभागाने आडकाठी केली होती. यावेळी अनेकदा विनंत्या करूनही अधिकारी दाद देत नव्हते. त्यावेळी मी मुख्यमंत्री मनोहर जोशींना कंटाळून सांगितलं की मी आता माझ्या पद्धतीने ठोकून काम करतो.. आणि पुढे गडचिरोलीत रस्त्यांची कामं सुरु झाली. पण त्यावेळी ही कामं सुद्धा करता आली नसती तर मी नक्षलवादी झालो असतो म्हणत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. नक्षलवाद संपवायचा असेल तर या भागात शिक्षण, आरोग्य आणि रोजगार पोहोचवण्याची गरज असल्याचं नितीन गडकरी यांनी आवर्जून सांगितलं..

मी ९० टक्के वेळा समाजकारण करतो आणि फक्त १० टक्केच राजकारण करतो असं सांगताना. मानकर स्मृती समितीच्या कामात आजपर्यंत कधीही सरकारी मदत घेतली नसल्याचं गडकरी म्हणाले. ४० हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेला रायपूर ते विशाखापट्टणम मार्ग गडचिरोलीमधून नेण्याचा प्रयत्न असल्याचंही केंद्रीय रस्ते विकास मंत्री गडकरी यांनी सांगितलं.. विदर्भात रोजगार निर्माण झाले तर या संपूर्ण भागातील आर्थिक आणि सामाजिक समस्या दूर होतील असंही ते म्हणाले. गडचिरोलीत सापडत असलेल्या उत्तम दर्जाच्या लोह खनिजामुळे या भागाचा कायापालट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अभिनेते सुनील शेट्टी यांनी नितीनजी गडकरी आणि कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती समितीच्या कामाचं कौतुक केलं.. अशा उत्तम कामाबद्दल ऐकल्यामुळेच मी खूप प्रभावित झाल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. एकलव्य एकल विद्यालयाच्या कामासाठी मदत करण्याची घोषणा सुनिल शेट्टी यांनी केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेल्या प्रशांत बोपर्डीकर यांनी गेल्या २० वर्षातले अनुभव सांगितले. दुर्गम भागात शिक्षणाची स्थिती दारक असल्याचं सांगतानाच मुलांना शिकवण्यासाठी स्थानिक हुषार तरुणांनाच प्रशिक्षण देत असल्याचं त्यांनी सांगितलं. मानकर स्मृती समितीच्या माध्यमातून काम करणारे शिक्षक ६ ते ८ किलोमीटर पायपीट करून शाळेत जाऊन शिकवतातय शिक्षणासह या शिक्षकांच्या माध्यमातून शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करत असल्याचं बोपर्डीकर म्हणाले. संस्थेच्या वतीने ग्रामस्वच्छता, कौशल्य प्रशिक्षण, एक गाव एक गणपती, वृक्षारोपण असे विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जात असल्याचं बोपर्डीकर यांनी सांगितलं.

या सत्कार समारंभाच्या आधी प्रसिद्ध कलाकार समीर चौगुले यांचा सम्या सम्या मैफिलीत माझ्या ह्या कार्यक्रम झाला. यावेळी सभागृहात उपस्थित लोकांची हसुन हसुन मुरकुंडी उडाली. तर कार्यक्रमाच्या नंतर विख्यात तालवादक तौफिक कुरेशी आणि सतार वादक निलाद्री कुमार यांच्या जुगलबंदीला रसिकांनी भरभरून दाद दिली. नागपूरातील सामाजिक संस्थेने ३० हजार मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवल्यानंतर आता शिक्षणापासून वंचित अशा राज्यभरातल्या एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निश्चय केल्याबद्दल उपस्थित नागरीकांनी समाधान व्यक्त केलं.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech