नागपूर : उपयोग असला तर त्याचा वापर करायचा आणि उपयुक्तता संपली की कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून द्यायची हे भारतीय पक्षाचे नेहमीच धोरण आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची उपयोगीता संपली आहे. त्यामुळे ते या स्थितीतून आणि दुःखातून कसे सावरतात याकडे महाराष्ट्र बघत आहे. धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते, अशी अवस्था त्यांची झाली असल्याची टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार रविवारी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले,अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांनी इंडिया आघाडी आशीर्वाद दिला. त्यामुळे तेथील जागा आम्ही जिंकलो. प्रभू रामचंद्र आमचे श्रद्धास्थान आहे. प्रभूरामचंद्रानी भाजपला नाकारले आहे. एनडीएने मॅजिक आकडा हा पूर्ण केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव खासदाराला महत्व दिले काय आणि ते गेले काय, त्यांना काही फरक पडणार नाही. अजित पवार गटाची आता मजबुरी आहे. यांना सत्तेसोबत राहावेच लागणार आहे. अजित पवारांनी कॅबिनेटची मागणी केली तरी एका खासदारावर कॅबिनेट मंत्रीपद ते कशाला देतील. लोकसभेच्या एका जागेवर अजित पवार गटाला एक राज्यमंत्रीपद मिळत होते, ते त्यांनी स्वीकारला हवे होते असेही वडेट्टीवार म्हणाले.