योजना हव्या असतील तर महायुतीचे सरकार हवे

0

बारामती : योजना सुरू ठेवायच्या असतील तर पुन्हा महायुतीचे सरकार हवे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत आयोजीत केलेल्या मेळाव्याप्रसंगी रविवार दि. १४ जुुलै रोजी केले.
बारामतीतील सभेत अजित पवार यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी सुरू असलेल्या योजनांचा पाढा वाचला. माझ्या बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातील माताभगिणींसाठी आपण लाडकी बहीण योजना आणली आहे.

तसंच तरुणांसाठी, शेतक-यांसाठीही हे सरकार चांगले काम करत आहे. मात्र या योजना सुरू ठेवायच्या असतील तर पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आणावे लागेल असे आवाहन अजित पवारांनी केले. बारामतीत पार पडलेल्या जनसन्मान मेळाव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत जनतेने विकासाला साथ द्यायला हवी, असे आवाहन केले आहे. निवडणूक काळात काही हवसे गवसे नवसे येतील, पण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हा अजित पवार शब्दाचा पक्का आहे, मी जे बोलतो ते करून दाखवतो असे म्हणत अजित पवार यांनी राज्य सरकारने अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या योजनांची माहिती उपस्थित जनसमुदयासमोर ठेवली.

अजित पवार यांनी आज बारामतीत आयोजित केलेल्या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. भर पावसात केलेल्या या भाषणात अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देत आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या अजेंड्याला बळी पडू नका, अशी साद बारामतीकरांना घातली. लोकसभा निवडणुकीत आम्ही संविधान बदलणार, असा खोटा प्रचार विरोधकांनी केला. मात्र जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत संविधान कोणीही बदलू शकणार नाही. आम्ही या संविधानानुसारच काम करत आहोत. आम्ही शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार मनात ठेवूनच काम करत आहोत अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech