कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे निर्देश
मुंबई : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामागारांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत असते. त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजनाही राबविते. बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी 90 दिवसाचे बांधकाम क्षेत्रासंबंधीत काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धत करावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी आज दिले.
मंत्रालयात 90 दिवसांचे प्रमाणपत्र देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए कुंदन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विकास आयुक्त (असंघटीत कामगार) तुकाराम मुंढे आदी उपस्थित होते.
कामगार मंत्री श्री. फुंडकर म्हणाले, ग्रामीण भागात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडाळाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहे. गावपातळीवर ग्रामविकास विभागाने 2017 मध्येच काढलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक 90 दिवसाचे प्रमाणपत्र देतो. मात्र सध्या ग्रामसेवकांमध्ये संभ्रमावस्था दिसून येते. ग्रामविकास विभागाने याच शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना सदरचे प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देशीत करावे.
बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या कुठलाही कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहता कामा नये, याबाबत दक्षता घेण्यात यावी. मुंबई शहरात बांधकाम कामगारांची नोंदणी वाढविण्यात यावी. शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार आहेत, मात्र नोंदणीअभावी लाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. पात्र शेवटच्या बांधकाम कामगाराला कल्याणकारी मंडळाचा लाभ मिळाला पाहिजे, अशा सूचनाही कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी दिल्या.
—