बदलापूर – बदलापूर राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा वाढता आलेख धक्कादायक आहे. अशाच एका घटनेने बदलापूर शहर हादरले आहे. बदलापूरमध्ये एका तरुणीने आपल्या मैत्रिणीवर विश्वासघात करून तिच्यावर लैंगिक अत्याचार घडवून आणला. पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या घरी गेली होती. त्या मैत्रिणीने, भूमिका मेश्राम, तिच्या पेयात गुंगीचं औषध मिसळलं, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर भूमिकाच्या एका मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित तरुणी घरी परतली नसल्याने तिच्या पालकांनी भूमिकाशी संपर्क साधला. तिने मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचे सांगितले, परंतु घरी परतल्यावर पीडितेला झालेल्या अत्याचाराची जाणीव झाली.
या घटनेनंतर पीडितेच्या पालकांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी भूमिका मेश्राम, तसेच तिच्या साथीदारांवर, शिवम राजे (२२) आणि संतोष रुपवते (४०), यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बदलापूर शहरात संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली आहे. पोलिस आता या अत्याचारात आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास करत आहेत.