नाशिक – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यांचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी प्रगती साधावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. उपराष्ट्रपती जगडीप धनखड यांच्या हस्ते राज्यात ऑनलाईन पद्धतीने संविधान मंदिराचे उदघाटन करण्यात आले. येवला येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संविधान मंदिराचे उद्घाटन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, सामाजिक कार्यकर्ते डॉ.मोहन शेलार, मलिक शेख, प्राचार्य वाय.के.कुलकर्णी, स्थानिक प्राचार्य आर.एस.राजपूत, गटनिदेशक आर.के.आहेर, डी.एल.मगर आदी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात मुलींना शिक्षण देण्याचे कार्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती करून देशातील सर्व नागरिकांना सर्वांना समान अधिकार प्राप्त करून दिले. सर्वांना समान पातळीवर अधिकार देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने मिळाले. भारतीय संविधान मजबूत पायावर उभे आहे. देशातील लोकशाही व्यवस्था टिकविण्यास आणि सर्वांना एकसंघ बांधून ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे. भारताच्या संविधानाचा अभ्यास करून अनेक देशांनी आपल्या संविधानाची निर्मिती केली आहे, असेही त्यांनी सांगितले.