भिंडेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; आणखी एकाला अटक

0

मुंबई – घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश प्रभुदास भिंडेला गुरुवारी (ता. 30 मे) किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडीतून 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. त्यामुळे त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. याच गुन्ह्यामध्ये गुरुवारी एसआयटीने मनोज रामकृष्ण संधू या इंजिनिअरला अटक केली असून या गुन्ह्यांतील ही दुसरी अटक आहे.

गेल्या वर्षी मनोज संधूने दुर्घटनासग्रस्त होर्डिंगसाठी स्टॅबिलिटी प्रमाणपत्र दिल्याचे तपासात उघडकीस आले. 13 मे रोजी युवा कंपनीचे एक होर्डिंग जवळच असलेल्या एका पेट्रोलपंपावर कोसळून त्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर 80हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याचा तपास आधी गुन्हे शाखेकडे त्यानंतर एसआयटीकडे सोपविण्यात आला होता. याच गुन्ह्यामध्ये भावेश भिंडेला 17 मे रोजी पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तो पोलीस कोठडीमध्ये असून त्याची पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपत होती. म्हणूनच भावेश भिंडेला दुपारी पुन्हा किल्ला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याच गुन्ह्यामध्ये मनोज संधू या दुसर्‍या आरोपीस पोलिसांनी अटक केली.

भावेशच्या कंपनीला मनोजनेच स्टॅबिलिटी प्रमाणपत्र दिले होते. महानगरपालिकेने काही इंजिनिअरला स्टॅबिलिटी प्रमाणपत्र देण्याची परवानगी दिली होती. त्यामध्ये मनोज संधूचा समावेश होता. 2023 रोजी त्याने ते प्रमाणपत्र दिल्यानंतर अवघ्या वर्षभरात हे होर्डिंग कोसळले. या गुन्ह्यामध्ये भावेशच्या कंपनीतील एका महिला अधिकार्‍याचा सहभाग उघडकीस आला होता. अटकेच्या भीतीने तिने विशेष सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तिच्या अटकपूर्व जामिनाला पोलिसांचा विरोध आहे. त्यामुळे तिला अटकपूर्व जामिन मिळणार नाही, यासाठी एसआयटीने प्रयत्न सुरु केले आहेत. तिची याचिका फेटाळली गेल्यास तिच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. भावेश, त्याची पत्नी आणि संबंधित महिलेच्या बँक खात्यामध्ये काही पैसे जमा झाले होते. या गुन्ह्यामध्ये काही बँक खाती तपासल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यांत आता कट रचणे या कलमांची वाढ करण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech