अफगाणिस्तानला भारताने धूळ चारली

0

ब्रिज टाऊन – टी-२० वर्ल्ड कपमधील डार्क हॉर्स समजल्या जाणा-या अफगाणिस्तानच्या संघाला भारताने धुळ चारली. सुपर-८ मधील पहिल्याच सामन्यात भारताने अफगाणिस्तानविरोधात ४७ धावांनी विजय साकारला.

भारताने प्रथमच या वर्ल्ड कपमध्ये १५० धावांचा पल्ला पार केला. सूर्यकुमार यादवने यावेळी तुफानी फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी साकारली. याच्या जोरावर भारताला प्रथम फलंदाजी करताना १८१ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या १८२ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने पहिल्या षटकात चांगली सुरुवात केली. पण दुस-याच षटकापासून भारताने अचूक गोलंदाजी केली आणि त्यांच्या धावसंख्येवर अंकुश लावला. त्यामुळे भारताला हा सामान जिंकता आला.

रोहित शर्माने चौकारासह दमदार सुरुवात केली असली तरी त्याला ८ धावांवरच समाधान मानावे लागले. पण त्यानंतर फार्मात नसलेल्या विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत भारताला स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु रशिद खानला मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्याने २४ धावा केल्या आणि या वर्ल्ड कपमधील त्याची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. त्यानंतर सूर्यकुमारने रशिद खानला चांगलेच धुतले आणि त्याच्या एकाच षटकात धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. सूर्याने यावेळी २८ चेंडूंत ५ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली.

भारताच्या १८२ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने पहिल्याच षटकात १३ धावा फटकावल्या. पण त्यानंतर दुस-या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला आणि त्याने फटकेबाजी करणा-या रहमनुल्लाह गुरबाझला बाद केले. जसप्रीतने त्यानंतर अजून एक यश भारताला मिळवून दिले. अक्षर पटेलने इब्राहिम झारदानला ८ धावांवर बाद केले आणि भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्यामुळे अफगाणिस्तानची ३ बाद २३ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फलंदाज बाद करीत ४७ धावांनी विजय साकारला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech