हिंदू नेत्याच्या हत्येनंतर भारताने, बांगलादेशला खडसावले

0

नवी दिल्ली : बांगलादेशातील जिहादींकडून हिंदू नेत्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेवर भारताने संताप व्यक्त करत युनूस सरकारने अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी द्यावी असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हंटले आहे. परराष्ट्र प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात ट्विट केलेय. बांगलादेशची राजधानी ढाक्यापासून सुमारे ३३० किलोमीटर उत्तर-पश्चिमेकडील दिनाजपूरच्या बसुदेबपूर गावचे रहिवासी असलेल्या भाबेश चंद्र रॉय (वय ५८) यांचा मृतदेह गुरुवारी रात्री आढळून आला. रॉय यांच्या पत्नी शांतना यांना संध्याकाळी साडेचारच्या सुमारास त्यांना एक फोन आला होता. यानंतर सुमारे ३० मिनिटांनंतर २ दुचाकींवर ४ जण आले आणि त्यांनी भाबेश यांना घराच्या परिसरातून जबरदस्तीने अपहरण केले. त्यांना नाराबारी गावात नेऊन अमानुष मारहाण केली यात त्यांचा मृत्यू झाला.

रॉय हे बांगलादेश पूजा उत्सव परिषदच्या बिराल विभागाचे उपाध्यक्ष होते. यासंदर्भात जयस्वाल आपल्या सोशल मिडीयवरील पोस्टमध्ये म्हणाले की, आम्ही बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक नेते भाबेश चंद्र रॉय यांच्या अपहरण व क्रूर हत्येने व्यथित आहोत. ही घटना बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील सुरू असलेल्या अत्याचारांच्या मालिकेतील एक भाग वाटते. अशाच प्रकारे यापूर्वीही घडलेल्‍या घटनांमधील गुन्हेगार अजूनही मोकाट फिरत आहेत. आम्ही निर्घृण हत्‍येचा निषेध करतो. बांगलादेशच्या अंतरिम सरकारला पुन्हा एकदा आठवण करुन देतो की, कोणताही भेदभाव किंवा सबब देणे थांबवावे. बांगलादेशमधील हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. असे जयस्वाल यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech