कोल्हापूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कोणत्या क्षणी काय निर्णय घेतील याविषयी जग चिंतेत आहे, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी-जीन पिंग कोणता निर्णय घेतील हे त्यापेक्षा चिंतेचा विषय आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे काहीच बोलत नाही; मात्र थेट कृती करतात, तर कोरियाचे ‘किम जो’ यांचे काय करता ते सांगता येत नाही. त्यामुळे संपूर्ण जग आज आर्थिक, राजनैतिक, सामाजिक, सामरिक आव्हानांना सामोरे जात आहे. जागतिक स्तरावर आज सत्याला चिरडले जात आहे. अशा बदलत्या स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाला स्वयंपूर्ण अणि सशक्त बनावे लागेल, असे आवाहन स्वामी रामदेव यांनी केले.
कोल्हापूरातील गांधी मैदान येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पतंजली योग समितीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात बोलत होते. या प्रसंगी भाजप खासदार श्री. धनंजय महाडिक, भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, केंद्रीय प्रभारी साध्वी देवप्रियाजी, सन्मती मिरजे, चंद्रशेखर खापणे, ‘हिल रायडर्स’चे प्रमोद पाटील, स्वामी विदेहदेव यांसह सहस्रो महिला उपस्थित होत्या.
स्वामी रामदेव पुढे म्हणाले, आपण सनातन संस्कृतीत विश्वास ठेवतो. ज्यात एक परमेश्वराचे निर्गुण निराकार रूप आहे, जे डोळ्याला दिसत नाही आणि दुसरे जे डोळ्याला जे दिसते ते मातृरूप आहे. जी आई ९ महिने आपल्याला गर्भात सांभाळते, अशा महिलेकडे आपण सर्वांनी आदर, गौरव, सन्मानाच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. त्यांचे सशक्तीकरण झाले पाहिजे, त्यांचा स्वाभिमान टिकला पाहिजे यासाठीच पतंजली योग समिती प्रयत्नशील आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्याला अद्यापही खरा इतिहास शिकवला जात नाही. औरंगबेज, अकबर, तसेच मोगल यांचाच इतिहास शिकवला जातो, तर महान भारतीय संस्कृती गौरवशाली परंपरा, क्रांतीकारक, पराक्रमी भारतीय राजे यांचा इतिहास समोर येत नाही. त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना लहानपणापासून योग्य शिक्षण द्यावे लागेल. ते काम ‘भारतीय शैक्षणिक बोर्ड’ करत आहे.