अलास्का – अमेरिकेच्या हवाईदलाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रेड फ्लॅग-२४’या हवाई युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाईदलाची तुकडी आज अमेरिकन हवाईदलाच्या अलास्का येथील एइल्सन हवाईतळावर दाखल झाली. या सरावात भारतीय हवाईदलातील राफेल ही फ्रेंच बनावटीची लढाऊ विमाने सहभागी होणार असून भारतीय हवाईदलाची विमाने आणि वैमानिकांची क्षमता या सरावामुळे जगाला दिसणार आहे.
‘रेड फ्लॅग-२४’मध्ये सहभागी होण्यासाठी राफेल विमानांनी अटलांटिक महासागर ओलांडून अमेरिकेत प्रवेश केला. त्यांना यासाठी हवाईदलाची सी-१७ ही मालवाहू विमाने आणि आयएल-७८ या हवेत विमानात इंधन भरणाऱ्या विमानाची बहुमूल्य साथ मिळाली. या प्रवासादरम्यान या विमानांनी ग्रीस आणि पोर्तुगाल येथे काही काळ थांबा घेतला, असे हवाईदलाने म्हटले. ‘रेड फ्लॅग’ हा बहुपक्षीय हवाई युद्धसराव अमेरिकी हवाईदलाकडून आयोजित करण्यात येतो. दहा दिवस चालणारा हा सराव वर्षातून ४ वेळा आयोजित केला जातो. हा सराव अलास्कातील इएल्सन या अमेरिकी हवाईदलाच्या तळावर आणि एल्मेंडोर्फ हवाईतळावर आयोजित करण्यात येतो.