नवी दिल्ली : भारत- किर्गिझस्तान दरम्यान होणाऱ्या खंजर या विशेष संयुक्त लष्करी सरावाच्या १२ व्या आवृत्तीला १० ते २३ मार्च या कालावधीत किर्गिझस्तानमध्ये प्रारंभ होत आहे. २०११ मध्ये सुरु झालेला हा लष्करी सरावाचा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. भारत आणि किर्गिझस्तान दरम्यान विविध ठिकाणी होणाऱ्या सरावांमुळे वृद्धिंगत होत असलेले धोरणात्मक राजनयिक संबंध प्रतिबिंबित होतात. या सरावाची मागील आवृत्ती जानेवारी २०२४ मध्ये भारतात आयोजित करण्यात आली होती.
भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व पॅराशूट रेजिमेंट (विशेष दल) करणार आहे आणि किर्गिझस्तानची स्कॉर्पियन ब्रिगेड त्यांचे प्रतिनिधित्व करणार आहे. शहरी आणि उंच पर्वतीय भूभागातील प्रदेशात दहशतवादविरोधी आणि विशेष दलांच्या कारवायांतील अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे हे या सरावाचे उद्दीष्ट आहे. या सरावादरम्यान स्नायपिंग, कॉम्प्लेक्स बिल्डिंग इंटरवेंशन, पर्वतीय कौशल्ये यासारख्या अत्याधुनिक विशेष दलांच्या कौशल्याचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे.
कठोर प्रशिक्षणाबरोबरच, या सरावामध्ये सांस्कृतिक आदान प्रदानाचाही समावेश आहे. त्यामध्ये किर्गिझस्तानचा नवरोजचा उत्सवही साजरा केला जाणार आहे. या सरावामुळे उभय देशांदरम्यान मैत्री दृढ होईल. या सरावामुळे, आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि कट्टरतावाद या सामायिक चिंता दूर करण्यावर भर दिला जाईल तसेच उभय देशांना आपले संरक्षण संबंध मजबूत करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हा सराव या प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षा सुनिश्चित कऱण्याप्रती भारत आणि किर्गिझस्तान यांच्या कटिबद्धतेचा पुनरूच्चार करतो.