भारतीय तोफ गोळ्यांना युरोपात मोठी मागणी

0

नवी दिल्ली : भारतात बनलेल्या तोफ गोळ्यांना युरोपात मोठी मागणी आहे. याशिवाय, भारत आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आग्नेय आशियातील देशांसोबत शस्त्रास्त्रे विकण्यासाठी चर्चा करत आहे. भारताने अलीकडेच फिलीपिन्ससोबत ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा करार केला आहे आणि व्हिएतनामसोबत ब्राह्मोस करारासाठी चर्चा सुरू आहे. भारतात बनवलेल्या तोफगोळ्यांना संपूर्ण जगातून मागणी येत आहे. अमेरिकेपासून युरोपीय देशांमध्ये भारतात बनणाऱ्या तोफगोळ्यांना चांगली मागणी येत आहे. जागतिक पुरवठा साखळीमुळे पश्चिमी देशांमध्ये दारूगोळ्याच्या उत्‍पादन कमी झाले आहे. अशा परिस्‍थितीत भारताने स्‍वत:च्या सुरक्षा उपकरणातील तोफखाना दारूगोळ्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला आहे. यातून भारताने एक पुरवठादार देश म्‍हणून आपले स्‍थान पक्‍के केले आहे.

भारत सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार, एका अहवालात म्‍हटले आहे की, भारतात १५५ मिमीचे तोफगोळे फक्‍त ३०० ते ४०० डॉलरमध्ये बनतात. हा खर्च पश्चिमी देश बनवत असलेल्‍या तोफगोळ्यांच्या तुलनेत दहाव्या भागापेक्षाही कमी आहे. त्‍यामुळे भारतीय तोफगोळ्यांची मागणी जगभरातून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारत सरकारने २०२९ पर्यंत शस्त्रास्त्र निर्यात दुप्पट करून ६ अब्ज डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने ३.५ अब्ज डॉलर्सची शस्त्रे विकली होती, परंतु तरीही ती लक्ष्यापेक्षा ३० टक्के कमी पडली. गेल्या दशकाच्या तुलनेत शस्त्रास्त्रांच्या विक्रीत मोठी वाढ झाली असली तरी, भारत सरकार अजूनही समाधानी नाही. गेल्या दशकात भारताची शस्त्र विक्री फक्त २३० दशलक्ष डॉलर्स इतकी होती.

काही भारतीय कंपन्यांना १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तोफगोळ्यांच्या ऑर्डर आधीच मिळाल्या आहेत. युक्रेन युद्धामुळे पाश्चात्य देशांचा शस्त्रसाठा झपाट्याने कमी झाला आहे आणि त्या देशांकडे तोफगोळे बनवण्याची क्षमता आहे, परंतु तयार होणारे तोफगोळे खूप महाग आहेत. तर भारत तोफगोळे अतिशय कमी किमतीत पुरवतो. युक्रेन युद्धात पाश्चिमात्य देशांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरवली आहेत. भारत संरक्षण उद्योग आता लहान शस्त्रे आणि घटकांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे भारत दारूगोळा आणि प्लॅटफॉर्म क्षेत्रात एक स्पर्धात्मक देश म्हणून स्थापित झाला आहे. गेल्या १० वर्षांचा विचार केला तर, २०१३-१४ मध्ये १९४० कोटी रुपयांवरून २०२३-२४ मध्ये २१,०८३ कोटी रुपयांपर्यंत, म्हणजेच शस्त्रास्त्रांच्या निर्यातीत सुमारे ३१ पट वाढ झाली आहे. अहवालानुसार, भारत १५५ मिमी तोफगोळे आणि हॉवित्झर, ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे, सर्विलांन्स आणि रडार प्रणाली, तेजस लढाऊ विमाने, हलके हेलिकॉप्टर आणि नौदल जहाजे यासारखी शस्त्रे विकत आहे किंवा विकण्याचा प्रयत्न करत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech