नवी दिल्ली : दक्षिण पूर्व आशियामध्ये दीर्घ पल्ल्याच्या तैनातीचा भाग म्हणून आयएनएस सुजाता आणि आयसीजीएस वीरा या जहाजांचा समावेश असलेले भारतीय नौदलाचे प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन (1TS) दिनांक १४ फेब्रुवारी रोजी कंबोडियाच्या सिहानोकविले बंदर येथे पोहोचले. कंबोडियाच्या सागरी संस्थांच्या प्रतिनिधींनी या जहाजांचे उत्साहाने स्वागत केले. १४ – १७ फेब्रुवारी या कालावधीत पोर्ट कॉल दरम्यान भारतीय नौदल आणि रॉयल कंबोडियन नौदल यांच्यात सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने ही जहाजे वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होतील.
या भेटी दरम्यान व्यावसायिक देवाणघेवाण, एकमेकांच्या प्रशिक्षण भेटी, सामाजिक संवाद, मैत्रीपूर्ण क्रीडा सामने आणि रॉयल कंबोडियन नौदलासह पासेक्स (PASSEX) यांचा समावेश आहे.या भेटीवेळी रॉयल कंबोडियन लष्कराला औपचारिकपणे स्मॉल आर्म्स सिम्युलेटर सुपूर्द करणे हे देखील समाविष्ट आहे. संरक्षण प्रतिबद्धता आणि क्षमता बांधणी हा भारत-कंबोडियाच्या प्रसन्न आणि सौहार्दपूर्ण संबंधांचा अविभाज्य भाग आहे आणि प्रशिक्षण तुकडीच्या भेटीचा उद्देश दोन्ही देशांमधील सागरी संबंध अधिक दृढ करणे हा आहे.यापूर्वी फेब्रुवारी २०२४ मध्ये, कंबोडियन नौदलाने विशाखापट्टणम येथे मिलन २४ सरावात सहभाग घेतला होता.सध्याच्या या भेटी भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाचा एक भाग म्हणून भारत-कंबोडिया संबंधांचे वाढते महत्त्व, सागरी संबंध आणि प्रादेशिक स्थिरता मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित करतात.