मुंबई – कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरातील हिंदू सभा मंदिरात खलिस्तानी समर्थकांनी रविवारी (३ नोव्हेंबर) हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान, खलिस्तानी झेंडे घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी मंदिरातील लोकांवर लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. विशेष म्हणजे, कॅनडातील भारतीय उच्चायुक्त मंदिरात वाणिज्य दूतावास शिबिरासाठी उपस्थित होते, त्यावेळीच हा हल्ला झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून जगभरातून या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. कॅनडाच्या विरोधी पक्षासह पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.
मात्र हल्ल्यामागील खलिस्तानी समर्थकांचा स्पष्ट उल्लेख ट्रुडो यांनी टाळला. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कॅनडातील हिंदू मंदिरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे हिंदू समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील या घटनेबद्दल आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियामध्ये असताना या हल्ल्याला अत्यंत चिंताजनक असे म्हटले असून, कॅनडा सरकारकडून या प्रकाराला न्याय मिळावा आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सोशल मीडियावर जयशंकर यांनी लिहिले,की कॅनडातील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. आपल्या मुत्सद्यांना धमकावण्याचा भ्याड प्रयत्न तितकाच भयंकर आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे भारताचा संकल्प कधीही कमकुवत होऊ शकत नाही.
सोमवारी (४ नोव्हेंबर)भारतीय उच्चायुक्तांनी ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिरात वाणिज्य दूतावास शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरादरम्यान खलिस्तान समर्थकांनी हल्ला करून भारतीयांवर मारहाण केली. कॅनडातील इतर अल्पसंख्याक समुदायांनीही या हल्ल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कॅनडातील अनेक नेत्यांनी या घटनेला निषेधात्मक शब्दांत उत्तर दिले असून ही घटना निंदनीय असल्याचे म्हटले आहे.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारला आवाहन केले आहे की, त्यांनी सर्व प्रार्थनास्थळांचे संरक्षण सुनिश्चित करावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.