हिंगोली : निवडणूक आयोगाकडून आज, शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली. मराठवाड्यातील हिंगोली येथे आयोजित प्रचारसभेसाठी ते राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांची तपासणी करण्यात आली. यासंदर्भातील व्हिडीओ शहा यांनी स्वतः ट्विटरवर (एक्स) शेअर केलाय. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज महाराष्ट्राच्या हिंगोली विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान माझ्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. भाजप निष्पक्ष निवडणुका आणि निरोगी निवडणूक व्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि माननीय निवडणूक आयोगाने बनवलेल्या सर्व नियमांचे पालन करतो. आपण सर्वांनी निरोगी निवडणूक प्रणालीमध्ये योगदान दिले पाहिजे आणि भारताला जगातील सर्वात मजबूत लोकशाही ठेवण्यासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे. गृहमंत्री अमित शहा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये निवडणूक अधिकारी त्यांचे हेलिकॉप्टर तपासत असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी केल्यावर उद्धव ठाकरे संतापले होते. त्यांनी याला विरोधकांना त्रास देण्याचे कारस्थान म्हटले होते. यवतमाळ जिल्ह्यात पोहोचल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘बॅग’ तपासली होती.
या तपासाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर करताना ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी आघाडीच्या इतर वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान हेच नियम लागू केले जातील का, असा प्रश्न विचारला होता. या घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगचीही तपासणी करण्यात आली असून त्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. यानंतर भाजपने एक व्हिडीओ जारी करून देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात पोहोचल्यावर त्यांची बॅग कशी तपासली हे सांगितले होते. दरम्यान, आज गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचीही तपासणीचा व्हिडीओ शेअर केलाय.. निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी अमित शहाशुक्रवारी हिंगोली दौऱ्यावर असताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे हेलिकॉप्टर तपासले याचा व्हिडिओ अमित शहा यांनी शेअर केला आहे.