नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीकडे आता अपघात नव्हे तर घातपात म्हणून पाहिले जात आहे. असून सीएए, एनआरसी विरोधातील लोकांपैकी अनेकांच्या हालचाली महाकुंभात दिसून आल्या होत्या. उत्तरप्रदेशचे दहशतवाद विरोधी पथक (यूपी-एटीएस) विशेष कार्य दल (एसटीएफ), स्नानिक गुप्तचर युनीट (एलआययू) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर सुमारे १० हजार लोक आहेत. यासोबतच १८ विविध तुरुंगांमध्ये कैद असलेल्या पीएफआय सदस्यांचीही चौकशी केली जात आहे.
गुप्तचर यंत्रणांनी सीएए, एनआरसी निदर्शक, गुन्हेगारी इतिहास असलेले लोक आणि राज्य सरकारविरुद्ध मोठे निदर्शने करण्याची योजना आखत असलेल्या लोकांबद्दल माहिती दिली होती. या आधारावर, उत्तर प्रदेशातील १ लाखाहून अधिक लोकांची पडताळणी करण्यात आली. महाकुंभाच्या आधी वाराणसी आणि आजूबाजूच्या १० जिल्ह्यांतील १६ हजार लोकांना काशीबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली. पण, काशीच्या बाहेर ११७ लोकांची हालचाल आढळून आली. यापैकी ५० हून अधिक लोक प्रयागराजला पोहोचले होते. ते सर्व गैरहिंदू आहेत. जेव्हा लोकांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी त्यांच्या हालचालीमागील वेगवेगळी कारणे सांगितली.
त्याचप्रमाणे, इतर शहरांमध्ये, एजन्सींनी संशयास्पद मानल्या जाणाऱ्या लोकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे, की त्यांना मनाई असूनही ते त्यांच्या शहराबाहेर का गेले..? तपास यंत्रणांनी मेळा परिसरात बसवलेल्या ६०० सीसीटीव्हींचे फुटेज पाहिले. संशयितांची ओळख फेस रेकग्निशन सिस्टम आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्ट वापरून करण्यात आली. यानंतर, तपास यंत्रणांनी १० हजारांहून अधिक लोकांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली. यापैकी ३० लोक बिगर हिंदू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य उत्तर प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील तुरुंगांमधूनही हा डेटा मागवण्यात आला आहे.