जांभेकर महिला विद्यालयाच्या शतक महोत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण

0

रत्नागिरी –  रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून शहरी व ग्रामीण भागातील सुमारे १५००० विद्यार्थी-विद्यार्थिनी संस्थेमध्ये विविध प्रकारचे शिक्षण घेत आहेत. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोदूताई जांभेकर विद्यालय यावर्षी शतक महोत्सवी वर्ष साजरे करण्यात असल्याने या कार्यक्रमांच्या प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले.

हा शतक महोत्सवी कार्यक्रम जानेवारी महिन्यात होणार आहे. या शतक महोत्सव कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राष्ट्रपतींनी निमंत्रण स्वीकारून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

स्त्री शिक्षणामध्ये आमूलाग्र क्रांती करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन कै. बाबुराव जोशी व कै. मालतीबाई जोशी या दांपत्याने अवघ्या तीन मुलींना घेऊन सौ. गोदूताई जांभेकर महिला विद्यालयाची स्थापना केली. भौगोलिकदृष्ट्या मागासलेल्या कोकण विभागात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. सन १९२५ ते १९६७ अशा प्रदीर्घ काळामध्ये कै. मालतीबाई जोशी यांनी मुख्याध्यापिका म्हणून काम करून हे विद्यालय नावारूपाला आणले. १९२५ साली रोवलेल्या रोपट्याचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सध्या सौ. गोदूताई जांभेकर महिला विद्यालयाचे शतकमहोत्सवी वर्ष आहे.

‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या उक्तीप्रमाणे फळाची आशा न बाळगता मालतीबाई सतत कार्य करत राहिल्या. त्यांच्या या निरलस स्त्रीशिक्षण कार्याचा गौरव तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांना १९६४ साली ‘राष्ट्रपती पुरस्कार’ देऊन केला होता, याची माहिती राष्ट्रपतींना देण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech