तेहरान – इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे आता नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. इराण सरकारच्या ३ शाखांच्या प्रमुखांनी २८ जून रोजी अध्यक्षांची निवडणूक घेण्यास अनुमती दिली आहे.
राजधानी तेहरानमध्ये अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीला इराणच्या कार्यकारी शाखेचे प्रमुख मोहम्मद मोखबर, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर गालिबाफ आणि न्यायपालिका प्रमुख घोलाम-होसेन मोहसेनी-इजेई उपस्थित होते.रइसी यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्यांदा तिन्ही प्रमुख शाखांच्या प्रमुखांची बैठक झाली आहे. इराणच्या राज्यघटनेनुसार विद्यमान अध्यक्षांचे पदावर असताना मृत्यू झाल्यास ५० दिवसांच्या आत सरकारच्या तिन्ही शाखांच्या प्रमुखांनी मिळून नवीन अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रीया निश्चित करणे आवश्यक आहे.
दरम्यान,सोमवारी झालेल्या या बैठकीत कायदेशीर व्यवहारांसाठी इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद देहघन, पालक परिषदेचे उपाध्यक्ष सियामक राहपेकंद आणि राजकीय घडामोडींचे उप आंतरिक मंत्री मोहम्मद तागी शाहचेराघी उपस्थित होते. निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ३० मे ते ३ जून या कालावधीत उमेदवारांना नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे, तर १२ जूनपासून १५ दिवसांचा प्रचाराचा कालावधी असणार आहे. रईसी यांच्या मृत्यूमुळे देशाचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनी यांनी ५ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.