रा.स्व. संघातून मला जीवनमूल्ये आणि संस्कार मिळाले, हे माझे भाग्यच – पंतप्रधान

0

नवी दिल्ली : गेल्या १०० वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताच्या चकाचकतेपासून दूर राहून साधकाप्रमाणे समर्पण भावाने काम केले आहे. अशा पवित्र संस्थेतून मला जीवनमूल्ये आणि संस्कार मिळाले, हे माझे भाग्य आहे, अशी भावना पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांना प्रदीर्घ मुलाखत दिली. तब्बल तीन तासांची ही मुलाखत एखाद्या परदेशी खाजगी माध्यमाला दिलेली पहिलीच मुलाखत आहे. ही आज (रविवार) रिलीज करण्यात आली.

मोदी म्हणाले की, आमच्या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा होती, तिथे देशभक्तीपर गाणी वाजवली जायची. त्या गाण्यांमधील काही गोष्टी मला खूप स्पर्शून गेल्या आणि अशा प्रकारे मी संघाचा भाग झालो. संघामध्ये आम्हाला दिलेल्या मूलभूत मूल्यांपैकी एक म्हणजे तुम्ही जे काही कराल, ते एका उद्देशाने करा. राष्ट्रासाठी योगदान देण्यासाठी करा. उदाहरणार्थ, मी अभ्यास केला तर मी इतका अभ्यास केला पाहिजे की तो देशासाठी उपयुक्त ठरावा. मी व्यायाम केला, तर इतका व्यायाम केला पाहिजे की, माझे शरीरही देशासाठी उपयुक्त ठरावे. हेच संघवाले शिकवतात. संघ ही खूप मोठी संघटना आहे. आता संघाचा १०० वा वर्धापनदिन जवळ आला आहे. एवढी मोठी स्वयंसेवी संस्था कदाचित जगात कुठेही अस्तित्वात नाही. संघाशी करोडो लोक जोडले गेले आहेत. पण संघाला समजून घेणे इतके सोपे नाही. त्याच्या कार्याचे स्वरूप खरोखर समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही गोष्टीपेक्षा, संघ तुम्हाला एक स्पष्ट दिशा प्रदान करतो, ज्याला खरोखर जीवनाचा एक उद्देश म्हणता येईल.

दुसरीकडे देश सर्वस्व आहे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. हे वैदिक काळापासून सांगितले जाते. हेच आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहे, हेच विवेकानंदांनी सांगितले आहे आणि हेच संघाचे लोक म्हणतात. संघाकडून मिळालेली प्रेरणा घेऊन तुम्ही समाजासाठी काहीतरी करा, असे स्वयंसेवक सांगतात आणि त्याच भावनेने प्रेरित होऊन आज अनेक उपक्रम सुरू आहेत. उदाहरणार्थ, काही स्वयंसेवकांनी सेवा भारती नावाची संस्था स्थापन केली. ही संस्था झोपडपट्ट्या आणि वस्त्यांमध्ये राहणाऱ्या गरीब लोकांना सेवा देते. यालाच ते सेवा समाज म्हणतात. माझ्या माहितीनुसार, ते जवळपास १ लाख २५ हजार सेवा प्रकल्प कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आणि केवळ समुदायाच्या पाठिंब्याने चालवतात. ते तिथे वेळ घालवतात, मुलांना शिकवतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात, चांगले संस्कार देतात आणि या समुदायांमध्ये स्वच्छता सुधारण्यासाठी कामे करतात. ही काही छोटी उपलब्धी नाही.

संघाने पालनपोषण केलेले काही स्वयंसेवक वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची सेवा करण्यासाठी समर्पित आहेत. ते आदिवासींमध्ये राहतात आणि त्यांच्या कल्याणासाठी काम करतात. त्यांनी दुर्गम आदिवासी भागात ७० हजारांहून अधिक शाळा उघडल्या आहेत. अमेरिकेतही असे काही लोक आहेत, जे त्यांच्यासाठी १० किंवा १५ डॉलर्स दान करतात. काही स्वयंसेवकांनी शिक्षणात क्रांती करण्यासाठी विद्या भारतीची स्थापना केली आहे. आज ते सुमारे २५ हजार शाळा चालवतात, सुमारे ३० लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देतात आणि मला विश्वास आहे की, या उपक्रमामुळे कोट्यावधी विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. शिक्षणासोबतच मूल्यांनाही प्राधान्य दिले जाते आणि विद्यार्थी समाजावर ओझे बनू नयेत, यासाठी त्यांनी डाउन टू अर्थ राहून कौशल्ये शिकवली जातात. म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मग ती महिला असो, तरुण असो किंवा मजूर असो, संघाने भूमिका बजावली आहे.

आमच्याकडे भारतीय मजदूर संघ आहे. त्याच्या अंतर्गत सुमारे ५० हजार युनियन आहेत, ज्यांचे देशभरात लाखो सदस्य आहेत. कदाचित प्रमाणाच्या बाबतीत जगात यापेक्षा मोठी कामगार संघटना नाही. पण ते कोणत्या प्रकारचा दृष्टिकोन स्वीकारतात ही मनोरंजक गोष्ट आहे. ऐतिहासिकदृष्ट्या डाव्या विचारसरणीने जगभरातील कामगार चळवळीला चालना दिली. त्यांची घोषणा काय आहे? ‘जगातील कामगारांनो, एक व्हा. संघ प्रशिक्षित स्वयंसेवकांनी चालवलेल्या कामगार संघटना कशावर विश्वास ठेवतात? ते म्हणतात, कामगारांनी जग एकत्र केले आहे. इतर म्हणतात, जगातील कामगार एक व्हा’ आणि आम्ही म्हणतो, ‘कामगारांनी जग एकत्र केले आहे.’ हा शब्दातला एक छोटासा बदल वाटत असला तरी हा एक प्रचंड वैचारिक बदल आहे. संघामधून येणारे स्वयंसेवक अशा उपक्रमांना बळ देतात आणि प्रोत्साहन देतात.

मी २४ फेब्रुवारी २००२ रोजी पहिल्यांदाच निवडून आलो. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा घटना घडली. हिंसाचार उफाळला. ही दंगल दुःखद होती. परंतु त्यानंतर राज्यात कायमस्वरूपी शांतता प्रस्तापित करण्यात यश आले. सरकारवर अनेक आरोप झाले. परंतु, दोन तपांनंतर न्यायव्यवस्थेने निर्दोष सोडले. कोविडने प्रत्येक देशाच्या मर्यादा उघड केल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटना जागतिक नियमांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्या. स्थिरता राखण्यासाठी निर्माण केलेल्या संस्था प्रासंगिकता गमावत आहेत. कायद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना कोणतेही परिणाम भोगावे लागत नाहीत.

दहशतीखाली जगण्याचा पाकिस्तानच्या जनतेला कंटाळा आला असेल. २०१४ मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार होतो, तेव्हा मी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना खास आमंत्रित केले होते. दोन्ही देश एक नवीन अध्याय सुरू करतील अशी आशा होती. परंतु त्यांनी विश्वासघात केला. भारत-चीनमध्ये संघर्ष नाही तर स्पर्धा असावी. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या माझ्या भेटीनंतर सीमेवर परिस्थिती सामान्य झाली. विश्वास निर्माण होण्यास वेळ लागेल, पण आम्ही संवादासाठी वचनबद्ध आहोत. २१ वे शतक हे आशियाचे शतक आहे. भारत आणि चीनने स्वाभाविकपणे स्पर्धा करावी, सामना नाही.

ट्रम्पवर ट्रम्प धाडसी आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. ह्युस्टनमधील एका कार्यक्रमात मी भाषण देत होतो आणि ट्रम्प श्रोत्यांमध्ये बसून ते ऐकत होते. हजारो लोक उपस्थित होते. भाषण झाल्यावर मी ट्रम्प यांना स्टेडिअमला फेरी मारण्याची व लोकांचे आभार मानण्याची विनंती केली. त्यांनी ती तत्काळ ऐकली. माझी ताकद मोदी नाही, तर १४० कोटी देशवासीय आहेत. मी जिथे जातो तिथे मोदी जात नाहीत, १४० कोटी लोकांचा विश्वास तिथे जातो. म्हणूनच जेव्हा मी कोणत्याही जागतिक नेत्याशी हस्तांदोलन करतो, तेव्हा मोदी हस्तांदोलन करत नाहीत. त्याला १४० कोटी लोकांचा पाठिंबा आहे. ही शक्ती मोदींची नाही तर भारताची आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या मुलाखतीबद्दल माहिती देत आपल्या जीवनातील महत्वाच्या चर्चापैकी ही एक चर्चात्मक मुलाखत आहे. तसेच ही एक रंजक मुलाखत होती. ज्यात माझ्या बालपणाचे किस्से आठवणी, हिमालयात मी घालवलेले दिवस आणि सार्वजनिक जीवनातील माझा काळ यावर चर्चा केलेली आहे. लेक्स फ्रिडमॅन यांनी देखील या पॉडकास्टची माहिती एका एक्स पोस्टद्वारे दिली आहे. त्यांनी लिहिलंय की, आपण नरेंद्र मोदी यांच्या सोबत एक शानदार तीन तासांच्या पॉडकास्टमध्ये चर्चा केली आहे. ही मुलाखत माझ्या जीवनातील सर्वात मोठ्या मुलाखतीपैकी एक आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech