नवी दिल्ली- सध्या सुरू असलेली अमरनाथ यात्रा आटोपल्यानंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी आतापासून तयारीला लागण्याच्या सूचना भारतीय जनता पार्टीने आपल्या राज्य पदाधिकाऱ्यांना काल दिल्या.जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी काल राजधानी दिल्लीत भाजपाची काल रात्री उशिरा महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना निवडणुकीची तयारी करण्याची सूचना देण्यात आल्या. राज्यातील सर्वच्या सर्व ९० जागा लढविण्यावरही बैठकीत चर्चा झाली. मात्र त्याचवेळी भाजपा समान विचारधारा असलेल्या पक्षांसोबत आघाडी करण्यासही तयार आहे,असे स्पष्ट संकेत बैठकीत देण्यात आले.राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्यादेखील निवडणुका लवकरच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज जम्मू आणि काश्मीरला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.लोकांपर्यंत भाजपाच्या धोरणांची माहिती पोहोचविण्यासाठी जनसंपर्क अभियान सुरू करण्याच्या सुचना नड्डा यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.