काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये काही दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाचा फटका अनेक नागरिकांना बसत आहे. दरम्यान आज, रविवारी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे जनजीवन अधिकच विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. या लोंढ्यात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. सुमारे ४० घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाच्या परिस्थितीमुळे रामबन जिल्ह्यात परिस्थिती बिकट झाली आहे. दोन हॉटेल्स, काही दुकाने आणि काही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. तसेच रामबन जिल्ह्यातील चिनाब नदीजवळील धर्मकुंड गावात भूस्खलन झाले असून, १० घरे पूर्णपणे खराब झाली असून, सुमारे ४० घरांचे नुकसान झाले आहे. तर ढगफुटीनंतर बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू असून, शेकडो नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे. आतापर्यंत ५०० जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या मते, जम्मू आणि काश्मीरमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. विशेषतः डोंगराळ आणि उंच भागात गडगडाटी वादळासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रामबन, उधमपूर, पुंछ आणि बारामुल्ला जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच येथील लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमधील रामबनमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या घटनेने मला खूप दुःख झाले आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना पीडित कुटुंबांसोबत आहेत. स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे, जेणेकरून मदत आणि बचाव कार्य त्वरित पार पाडता येईल.