मुंबई : उन्हाळ्याचे कारण पुढे करीत राज्यातील गाय व म्हशीच्या दुधाच्या दरात लिटर मागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली असली तरी ती ग्राहकांवर अन्याय करणारी व एकूणच जनतेची फसवणूक करणारी असल्याचा आरोप जनता दल (से) मुंबई तसेच मूलभूत हक्क संघर्ष समितीने (मास) केला आहे. राज्य सरकारने हस्तक्षेप करून दूधसंघांना ही दरवाढ मागे घेण्यास सांगावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
गायी- म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याची घोषणा दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने काल केली. दुधाचे दर ठरविण्यासाठी राज्यात पुष्टकाळ व कृष काळ असे वर्षाचे दोन भाग करण्यात येतात. पावसाळ्यात चारापाणी उपलब्ध असल्यामुळे ऑक्टोबर ते मार्च हा जास्त उत्पादनाचा म्हणजे पुष्ट काळ मानला जातो, तर एप्रिलपासून उन्हाळा सुरू झाला की चाऱ्यापाण्याची टंचाई जाणवून हळूहळू दूध उत्पादनात घट होते. त्यामुळे हा कृष काळ मानला जातो. त्यामुळे ऑक्टोबर मध्ये दुधाचे दर एक-दोन रुपयांनी कमी केले जातात तर मार्च एप्रिलमध्ये पुन्हा ते वाढवून दिले जातात. परंतु हे करताना राज्यातील दूध संघ लबाडी करीत असतात! ऑक्टोबरमध्ये दुधाचा खरेदी दर कमी केला तरी त्याचा लाभ ग्राहकांना दिला जात नाही. मात्र एप्रिलमध्ये दूध पुरवठा कमी झाला असे सांगून, विक्री दरात वाढ केली जाते. या दुष्टचक्रामुळे खरेदी व विक्री दरातील तफावत तब्बल २८ ते ३० रुपयांवर गेली आहे.
दुधाच्या दरातील या खेळात उत्पादक शेतकरी व ग्राहक या दोघांचेही शोषण होत असून मधल्यामधे दूध संघांचे संचालक मालदार होत आहेत. यावर्षी २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी दुधाच्या खरेदी करत तब्बल तीन रुपयांनी कपात करण्यात आली होती. मात्र त्याचा लाभ शहरी ग्राहकांना देण्यात आला नाही. त्यामुळे दूध संघांचा लिटरमागे तीन रुपयांनी लाभ झाला. आता उन्हाळा सुरू झाला म्हणून दूध संघाने विक्री दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यात तब्बल पाच रुपयांनी संघांचा मलिदा वाढला आहे.
ही ग्राहकांची उघडउघड फसवणूक आणि लूट असल्याचे टीका प्रदेश जनता दलाचे चिटणीस संजय परब, मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, सरचिटणीस प्रशांत गायकवाड, जिल्हाध्यक्ष संजीकुमार सदानंद, नम्रता जाधव, यतीन तोंडवलकर तसेच मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे दिनेश राणे संग्राम पेठकर आदींनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हस्तक्षेप करून ही दूध दरवाढ मागे घेण्यास दूध संघांना भाग पाडावे, अशी मागणी या सर्वांनी केली आहे. दरवाढ मागे घेण्यात न आल्यास ठराविक प्रमुख दूध संघांच्या दुधावर बहिष्कार टाकण्याची मोहीम राबविण्यात येईल, असा इशाराही या सर्वांनी दिला आहे.