साहिबगंज – झारखंडच्या साहिबगंजमध्ये असामाजिकतत्त्वांनी स्फोट घडवून रेल्वेट्रॅक उडवल्याची घटना घडली आहे. साहिबगंजच्या लालमाटिया ते फरक्का एमजीआर रेल्वे मार्गावर ही भीषण घटना घडली. यासंदर्भात रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार,साहिबगंज जिल्ह्यातील बरहेत पोलीस स्टेशन हद्दीतील रंगा घुट्टू गावाजवळ लालमटिया ते फरक्का हा एमसीआर रेल्वे मार्ग स्फोटकांनी उडवण्यात आला. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटानंतर रुळावर 3 फूट खोल खड्डा पडला आहे. रेल्वे ट्रॅकपासून सुमारे 39 मीटर अंतरावर ट्रॅकचे तुकडे सापडले. तर, अधिकाऱ्यांना घटनास्थळावरुन स्फोटकांचे सामानही सापडले आहे.घटनेची माहिती मिळताच झारखंड पोलीस, आरपीएफ आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घातपातामागे नेमके कोण आहे याचा तपास केला जात आहे. एफएलएलच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. या घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या रेल्वे मार्गाचा वापर कोळसा वाहतूक करण्यासाठी केला जातोया स्फोटाचा आवाज एमजीआर रेल्वे मार्गाच्या आजूबाजूच्या गावातील लोकांनाही ऐकू आला. घटनास्थळी पोल क्रमांक 42/02 वर कोळसा भरलेली ट्रेन उभी होती. ट्रॅक उडवल्यामुळे ट्रेन पुढे जाऊ शकली नाही. गेल्या काही वर्षांपासून आसाममधील प्रतिबंधित दहशतवादी संघटना नॅशनल संथाल लिबरेशन आर्मीचे लोक या भागात सक्रिय आहेत. या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत आहेत.