माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने शोभायात्रेचे आयोजन
कल्याण : कल्याणकारांची यंदाची श्रीराम नवमी सर्वार्थाने अत्यंत भक्तीमय आणि भारदस्त अशी ठरली. निमित्त होते ते भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेचे. कल्याणातील प्रत्येक समाज घटकाने या शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याने यंदाची ही शोभायात्रा अभूतपूर्व अशी ठरली. कल्याण पश्चिमेतील ऐतिहासिक दुर्गाडी देवीच्या महाआरतीनंतर दुर्गाडी चौकातून सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास या शोभायात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. श्रीरामाची प्रतिमा असणारे भगवे झेंडे, भगव्या टोप्या आणि पारंपारिक भगवी वस्त्रे घालून हजारो श्रीरामभक्त या शोभायत्रेत सहभागी झाले होते. तर त्याजोडीला ढोल ताशांचा गजर आणि जय श्रीरामाच्या घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेलेला पहायला मिळाला. विशेष म्हणजे कल्याण शहरातील प्रत्येक समाजाचे शेकडो ज्ञाती बांधव-भगिनींनीही पारंपरिक पोशाखात या शोभायात्रेत सहभाग घेतल्याचे दिसून आले. त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या भव्य मिरवणुकीत प्रभू श्रीरामांचा, अयोध्या येथील श्रीराम मंदिर, महापराक्रमी श्री हनुमान, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, संत परंपरा, पतंजली योग समिती, श्री संत गजानन महाराज शेगाव भक्त मंडळ, आणि संत गजानन महाराज मंदिर संस्था, इस्कॉन संस्था, प्रजापिता ब्रह्मकुमारी यांसह विविध पारंपरिक चित्ररथ, महाराष्ट्राच्या विविध भागातील कला – संस्कृती यांचे दर्शन, पारंपरिक आदिवासी नृत्ये, कल्याणातील विविध आध्यात्मिक संस्थांचे चित्ररथांसोबत साहसी खेळाचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. तसेच योगसंध्या वेलनेस स्टुइओ यांच्या ग्रुपने सादर केलेल्या चित्ररथथात प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान, भरत आदींच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या. ज्या या शोभायत्रेचे मुख्य आकर्षण ठरल्या. पारंपरिक आणि सांस्कृतिक चित्ररथांसोबतच तलवारबाजी, दांड पट्टा, लाठी काठी अशा मैदानी आणि धाडसी खेळांचे प्रात्यक्षिकही या शोभायात्रेत सादर करण्यात आले. ज्यामध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत अतिशय कौशल्यपूर्ण असे लाठी काठीचे प्रात्यक्षिक सादर करून दाखवले.
टाळ मृदंगाच्या गजरात नामघोषात तल्लीन झालेले वारकरी बांधव तर आपल्या पारंपरिक पोशाखात आलेले राजस्थानी, बंजारा समाज, दक्षिण भारतीय समाज बांधव आणि भगिनी यांच्यासोबत प्रत्येक समाज घटक आपल्या विभागाच्या संस्कृती आणि परंपरेनुसार तितक्याच आत्मियतेने आपापल्या चित्ररथाच्या साथीने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. दुर्गाडी चौकापासून सुरू झालेली ही शोभायात्रा लालचौकी, सहजानंद चौक, देवी अहिल्यामाता चौक, लोकमान्य टिळक चौकमार्गे पार नाका येथील श्रीराम मंदिर येथे महाआरती करून मग संपन्न झाली. पार नाका येथे महा आरतीनंतर या शोभायात्रेचा समारोप झाल्यानंतर सुप्रसिद्ध इस्कॉन संस्थेतर्फे उपस्थितांना प्रसाद वाटपही करण्यात आले.
अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर प्रभू श्रीरामांना आपले मंदिर प्राप्त झाले. हा केवळ हिंदुस्थानातील नव्हे तर संपूर्ण जगभरातील हिंदूंच्या दृष्टीने आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. त्याच अभिमानातून आजच्या श्रीराम नवमीच्या शोभायात्रेत श्रीरामभक्तांचा जनसमुदाय लोटल्याने या शोभायात्रेलाअभूतपूर्व असे स्वरूप प्राप्त झाल्याची भावना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.