कल्याण – कल्याण शहरात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. शहरात चोरांचा सुळसुळाट पसरला असून त्याचा फटका सामान्य नागरिक, दुकानदारांनाही बसत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये चोरांचा धुमाकूळ घालत एकाच रात्री एका बारसह चार दुकानं लुटली. तसेच एक घरात घुसून चोरी करत लाखो रुपयांचा माल लंपास केल्याची माहिती मिळाली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोळसेवाडी पोलिसांना चोरांचे खुले आवाहन आहे. पोलिसानी याप्रकरणी तपास सुरू केला असून चोरांचा शोध घेतला जात आहे.
कल्याण पूर्वेतील गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता कोळसेवाडी पोलिस ठाणे हद्दीतील गणेशवाडी, मच्छिमार्केटच्या वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्यावर चोरट्यांनी एका बारसह अनेक दुकानांची शटर्स तोडून मुद्देमाल आणि रोख रक्कम लंपास केली. बुधवारी मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुधवारी मध्यरात्री सर्व शहर झोपेत असताना २ ते ३ च्या सुमारास गणेश वाडीतील अमृत पॅलेस बार,अन्नपूर्णा मालवणी स्टोअर्स, पानेरी हे कपड्यांचे दुकान, केअर अँड कॅअर, मेडीकल स्टोअर्स, या दुकानांमध्ये चोरटे शिरून त्यांनी चोरी केली. तसेच देवी दयाल टॉवर जवळील एक निवासी घरात घुसूनही चोरट्यांनी घरातील सामान, दागिने लुटले. ही घरफोडी करत चोरांनी एक लाख रुपयांहून अधिक किमतीची रोकड व मौल्यवान वस्तू लंपास केल्या. धक्कादायक गोष्ट म्हणडे चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र अश्या प्रकारे भरवस्तीत, नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी खुलेआम चोरी होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरांनी एकाप्रकारे पोलिसांना खुले आव्हान दिले असून परिसरातील रहिवासी व व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.