खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगने घेतली ५० हजारांहून अधिक मतांनी आघाडी

0

आसाम – देशभरात लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. पंजाबमधील ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख व खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याने लोकसभेची निवडणूक लढवली. भारत निवडणूक आयोगाने सकाळी साडे दहापर्यंत जाहिर केलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार, पंजाबमधील खदूर साहिब येथून अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढणाऱ्या अमृतपाल सिंगने ५०४०५ मतांनी आघाडी घेतली आहे. खदूर साहिब लोकसभा मतदारसंघात अमृतपाल सिंग विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार कुलबीर सिंह झिरा अशी चुरशीची लढत होत आहे. तर येथील आम आदमी पार्टीचा उमेदवार तब्बल ५१,३२८ मतांनी पिछाडीवर आहे.

एप्रिल २०२३ मध्ये अमृतपाल सिंगला अटक करण्यात आली होती. अमृतपालच्या सहकाऱ्याला अटक केल्यामुळे पोलीस ठाण्यावर जमावाने हल्ला केल्यानंतर अमृतपाल सिंग चर्चेत आला होता. खलिस्तान समर्थक असलेल्या अमृतपाल सिंगवर एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सध्या आसाममधील दिब्रुगढ येथील तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खदूर साहिब मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार जसबीर सिंह गिल विजयी झाले होते. यावेळी खदूर साहिब लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार अमृतपाल सिंग, काँग्रेसचे कुलबीर सिंह झिरा, अकाली दलचे विरसा सिंह वल्टोहा व आम आदमी पक्षाचे उमे कीदवार ललजीत सिंह भुल्लर यांच्यात लढत होत आहे. आसाममधील तुरुंगातून निवडणूक लढवणारा खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग विजयी होतो की पराभूत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech