पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा पहिल्यांदाच दहावीचा निकाल मे महिन्यात आला असून, यावेळी ९५.८१ टक्के लागला आहे. तर कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९४.७३ टक्के लागला. यासोबतच लातूर विभागाने आपला पॅटर्न कायम राखत विभागातून १२३ विद्यांर्थांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.
१० वी बोर्डाच्या परीक्षेस पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४९,३२६ विद्यार्थी या परीक्षेकरता प्रविष्ट झाले होते. यातील १४,८४,४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाच्या निकालाची एक्केवारी ९५.८१ एवढी आहे. मागील १० वी बोर्डाचा वर्षी ९३.२३ टक्के निकाल लागला होता. म्हणजेच, मागील वर्षाच्या तुलने यंदा टक्केवारीत १.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.