कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क काढण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा
नाशिक : उत्तर प्रदेशमध्ये मागील महिन्यात महाकुंभमेळा पार पडला. आता पुढे त्र्यंबक व नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार तयारी केली जात असून प्रयागराजच्या धर्तीवरच त्र्यंबकेश्वर आणि नाशिक मध्ये देखील सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यात येत असून या संदर्भात प्राधिकरण स्थापन करून त्या मार्फत व्यवस्थापन आणि प्रशासकीय नियोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क काढण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा होईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी सरकारची आढावा बैठक पार पडली. यानंतर यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे ,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनआमदार प्रा देवयानी फरांदे , आमदार सीमा हिरे हे देखील उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, केंद्र सरकारचे मी धन्यवाद मानतो की आमच्या मागणीला प्रतिसाद देत कांद्यावरचे निर्यात शुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. २० टक्के निर्यात शुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विशेषतः नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमधील शेतकरी या निर्णयामुळे सुखावला आहे. ही शहरं कांद्याची हब आहेत. यातील शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. यापुढे देखील कांदा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे प्रयागराजमधील कुंभमेळ्याच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये देखील मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारकडून पूर्ण तयारी आणि उपाययोजना केली जात आहे. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेत पाहणी देखील केली आहे. कुशावर्त तिर्थाची पाहणी केली आहे. त्र्यंबकेश्वराच्या विकासाचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करत आहोत. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वरचा देखील विकास केला जाणार आहे. कारण हे एक प्रमुख ज्योतिर्गलिंग आहे. देशभरातून भाविक येथे येत असतात. सुमारे ११०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये दोन टप्पे असतील. पहिला टप्पा सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत होईल तर दुसरा टप्पा त्यानंतर पूर्ण केला जाईल. यामध्ये दर्शनासाठी, पार्किंगसाठी व्यवस्था, कोरिडॉर, शौचालय आणि कुंडांची स्वच्छता आणि त्यांचे पुर्नवसन केले जाणार आहे. मंदिराचा काही भाग पुनर्संचयित करण्यात येणार असून आवश्यक त्या सुविधा दिल्या जातील, सिंहस्थ कुंभमेळ्याासाठी अनेक पुल बांधत आहोत. घाटांवर नवीन सोयी सुविधा तयार करण्यात येतील. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी शुद्ध आणि सुरक्षित राहिले पाहिजे, यासाठी आराखडा तयार केला आहे. सिंहस्थच्या आधी ही काम पूर्ण करण्यात येतील. या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लोक असतात. त्या सर्वांची योग्य सोय करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.