मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केल्याप्रकरणी आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून कुणाल कामराच्या विरोधात शिवसेनेचे (शिंदे) नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कुणाल कामराविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात कुणाल कामराविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. तसेच कुणाल कामराच्या गाण्यावरून सुरु झालेल्या वादावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया देत कारवाईचे संकेत दिले आहेत. यानंतर आता राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत बोलताना एक मोठी घोषणा केली आहे. कुणाल कामराचे सीडीआर तपासले जाणार, बँक खात्याचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती मंत्री योगेश कदम यांनी सभागृहात बोलताना दिली आहे.
“सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तींवर अशा प्रकारची वक्तव्य केली जात असतील तर याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. अजिबात कोणाला सोडलं जाणार नाही. अशा प्रकारची स्टॅण्डअप कॉमेडी आम्ही चालू देणार नाहीत. कुणाल कामराचा बोलवता धनी कोण आहे? कारण घटनाक्रम देखील लक्षात घेतला पाहिजे. काही ठराविक ट्वीट केले गेले आहेत. सर्व विषयांचे गांभीर्य लक्षात घेता कुणाल कामराचे सीडीआर तपासले जातील, सर्व कॉल रेकॉर्ड तपासले जातील. बँक खात्याची चौकशी केली जाईल, याचा सुत्रधार कोण? आणि असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल”, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिली आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे – देवेंद्र फडणवीस
“स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार कोणालाही आहे. मात्र, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. खरं म्हणजे कुणाल कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्रातील जनतेने २०२४ साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार? हे दाखवून दिलेलं आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली? हे जनतेने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या स्थराची कॉमेडी करून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे चुकीचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
“तुम्ही जरुर स्टँडअप कॉमेडी करा, पण अपमानित करण्याचं काम कोणी करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. तसेच कुणाल कामरा जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत, ते संविधान जर त्यांनी वाचलं असेल तर संविधानाने सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.