लाडकी बहीण योजनेंतर्गत 5,03,080 अर्ज पात्र, 37 हजार त्रुटीयुक्त

0

ठाणे – “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेसाठी ठाणे जिल्ह्यातून एकूण 5 लाख 3 हजार 80 अर्ज पात्र ठरले असून 37 हजार अर्ज त्रुटीयुक्त आहेत. मात्र अद्याप ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न केलेले नाही, अशा महिलांनी संबंधित बँकेत जावून बँक खाते आधार कार्डशी संलग्न करण्याची कार्यवाही करून घ्यावी, तसेच त्रुटी असलेल्या अर्जांच्या बाबतीत संबंधित महिलांनी तात्काळ आशा सेविका/ अंगणवाडी सेविका/ ग्रामसेवक किंवा ज्यांच्याकडून अर्ज भरुन घेतला असेल त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड व जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संजय बागूल यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी संबंधित महिलेचे बँक खाते आधार संलग्न (आधार सीडिंग) केलेले असणे आवश्यक आहे.

“मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेसाठी अर्ज करताना अर्जामध्ये नमूद आधार क्रमांकाला संलग्न केलेल्या बँक खात्यात लाभाची रक्कम थेट (डीबीटीद्वारे) जमा केली जाणार आहे. त्यामुळे महिलांनी आपले बँक खाते आधार संलग्न करून घेणे आवश्यक आहे. तसेच बँक खात्याची ई-केवायसी करणेही आवश्यक आहे. ई-केवायसी करण्याची कार्यवाही नजीकच्या सेतू केंद्रावर करता येईल. मात्र, बँक खाते आधार संलग्न करण्याची कार्यवाही संबंधित बँकेत जावून करणे आवश्यक आहे.

बँक खाते आधार संलग्न करण्याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आणि संबंधित बँकांना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. योजनेसाठी अर्ज सादर करताना काही महिलांनी आपले खाते आधार संलग्न नसल्याचे नमूद केले आहे. अशा महिलांनी आपले बँक खाते आधार संलग्न करण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी,त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने त्रुटीयुक्त प्रकरणांनाही न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी त्रुटी असलेल्या संबंधित महिलेने आपल्या नजीकच्या आशा सेविका/अंगणवाडी सेविका/ग्रामसेवक किंवा ज्यांच्याकडून अर्ज भरुन घेतला असेल त्यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा व आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून आपला अर्ज मंजूर करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech