मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा मुंबईतील बीकेसी येथे होत असून महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना युबीटी पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. तर, लाडक्या बहिणींना 3000 रुपये दरमहा देण्यात येतील. यासह, शेतकऱ्यांसाठी कर्ममाफीची योजना व जातनिहाय जनगणना करण्याची घोषणाही मविआच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी केलेल्या 2100 रुपयांपेक्षा 900 रुपये जास्त रक्कम लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीने जाहीर केले आहे. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांन मोफत बसप्रवास देण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.
“प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यावर 3 हजार रुपये खटाखट जमा होणार आहेत. महाराष्ट्रातील महिलांना बस सेवा मोफत दिला जाईल, एक रुपया घेतला जाणार नाही. भाजप सरकारने महागाई वाढवली आहे. बेरोजगारी वाढवली आहे. त्यामुळे आमची पहिली गॅरंटी म्हणजे महिलांना 3 हजार रुपये आणि मोफत बससेवा सुरु करत आहोत”, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, भारतात 15 टक्के दलित लोकसंख्या आहे. 8 टक्के आदिवासी आहेत. मात्र, आजपर्यंत कोणालाही माहिती नाही की, मागासवर्गीयांची लोकसंख्या किती आहे? भारतातील संस्था पाहिल्या तर तिथे दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय लोक दिसत नाहीत. त्यामुळे आम्ही म्हणत आहोत की, ऐतिहासिक निर्णय घेत जातीय जनगणना केली जावी. प्रत्येकाला समजले पाहिजे की, आपला वाटा किती आहे? लढाई विचारधारेची आहे.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, भुगोल, विज्ञानाविषयी माहिती नसेल तर चालेल वाईच चॅन्सलर व्हायचं असेल तर शाखेत जायला हवं. निवडणूक आयोगावर दबाव टाकतात. ईडी, सीबाआयचा वापर करुन सरकार पाडतात. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पैसे देऊन हटवले गेले. उद्योगपतींची मदत करण्यासाठी सरकार हटवण्यात आले. धारावीची एक लाख कोटींची जमीन, गरिबांची जमीन तुमच्याकडून बळकावली जात आहे. एक लाख कोटींची जमीन तुमच्या डोळ्यासमोरुन एका अब्जाधीशाला दिली जात आहे. तुमचे उद्योगला गुजरातला नेले जात आहेत. टाटा एअर बस, आयफोन मॅनोफॅक्चरींग, गेल पेट्रो केमिकल प्रोजेक्ट हे उद्योग गुजरातला नेण्यात आले.
तुम्हाला सांगतात, महिलांना पैसा देणार आहोत. भाजप सरकारने महागाई वाढवली आहे. गॅस सिलिंडर पेट्रोलचे भाव वाढवले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाकडून पैसे काढून उद्योगपतींच्या खिशात घालतात. हे केवळ उद्योगपतींचे काम करतात. भाजपने बेरोजगारी आणली आहे. रोजगार उद्योगपती देऊ शकत नाहीत. उद्योगपती जमिनी बळकावू शकतात. रोजगार लघू-मध्यम उद्योग करणारे लोक देऊ शकतात. नोटबंदी आणि जीएसटी ही पॉलिसी नाही, छोट्या उद्योगपतींना संपवण्याचं काम आहे. देशात सर्वात जास्त टॅक्स छोटे कामगार देतात. शर्ट घेतल्यावर टॅक्स द्यावा लागतो. सगळीकडे अप्रत्यक्षरित्या टॅक्स लागतोय. ही भाजपची पॉलिसी आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.