मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ऑफलाईन अर्ज स्वीकृती प्राक्रियेला सुरुवात

0

मुंबई – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आजपासून ऑफलाईन अर्ज स्वीकृती प्राक्रियेला सुरुवात करण्यात आली असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज स्वीकृती केंद्र स्थापित करण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण भरलेला अर्ज या केंद्रांवर सादर करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या वतीने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ ही महत्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी शासनाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेच्या सुविधा केंद्रांवर पात्र लाभार्थ्यांची गर्दी होऊ नये, तसेच नागरिकांचा वेळ वाचावा यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याच्या सूचना राज्यशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी स्वतंत्रपणे ऑफलाईन अर्ज स्वीकृती केंद्र स्थापित करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या वतीने स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलेल्या ऑफलाईन अर्ज स्वीकृती केंद्रांवर सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु असणार आहे. त्यासाठी सर्व केंद्रांवर दोन पाळींमध्ये (शिफ्ट) कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ अशा दोन पाळींमध्ये मध्ये पात्र लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑफलाईन अर्ज स्वीकृती केंद्रांवर सकाळी प्रत्येक केंद्रांवर ५ असे ४० कर्मचाऱ्यांची आणि दुपारच्या सत्रात प्रत्येक केंद्रांवर ५ असे ४० कर्मचाऱ्यांची एकूण ८३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महापालिकेकडे नोंद असलेल्या बचत गटांच्या महिलांमार्फत घरोघरी जाऊन या योजनेचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. आवश्यता भासल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील आय ई सी संस्थांचे कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयातील एनएसएस आणि एनसीसी च्या विद्यार्थ्यांना यासाठी सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती, जांभळे पाटील यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech