सोलापूर : चैत्री यात्रा कालावधीत सुमारे २ ते ३ लाख भविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांना सुविधा देण्याची जबाबदारी १२०० कर्मचारी व स्वयंसेवक पार पाडणार असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. अन्नछत्रामध्ये दुपारी १२ ते २ व रात्री ७ ते ९ या वेळेत अन्नदान सुरू राहणार असून, दर्शन रांगेत दशमी, एकादशी, द्वादशीला लिंबू सरबत, मठ्ठा व तांदळाची अथवा साबुदाण्याच्या खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे.
या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षाने पालन करण्यात येणार असून, त्याबाबतचे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये नवमीला श्रीराम नवमी जन्मोत्सवानिमित्त विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) ह. भ. प. श्रीकांत महाराज पातकर, पंढरपूर यांचे कीर्तन, ह. भ. प. आजरेकर महाराज पंढरपूर यांचा व्दादशीला नैवेद्य, त्रयोदशीला ह. भ. प. गुरू बाबासाहेब आजरेकर महाराज, पंढरपूर यांची कीर्तनाची परंपरा असून, एकादशीला पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा अनुक्रमे सदस्य ह. भ. प. शिवाजीराव मोरे व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न होत आहे.