मुंबई : गुडी पाडव्याच्या पवित्र दिवशी भारतीय सदविचार मंच या सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक संस्थेतर्फे दत्तक घेतलेल्या काजूपाडा (घोडबंदर रोड, वरदान लोक आश्रमसमोर, ठाणे) बस्तीत निराधार पेन्शन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून निराधार, एकटे वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवन सुसह्य व सन्माननीय करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा ₹७५०/- (सातशे पंचावन्न रुपये) पेन्शन देण्यात येणार आहे. काजूपाडा येथील वृद्ध महिला चंद्रकला साळुंखे या या योजनेच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या, ज्यांना एप्रिल, मे आणि जून २०२५ या तीन महिन्यांसाठी ₹२२५०/- (दोन हजार दोनशे पन्नास रुपये) मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच, काजूपाडा आणि परिसरातील गरजू नागरिकांचा सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
संस्थेच्या वतीने बस्तीतील सामूहिक कार्यक्रमांसाठी २० नवी खुर्च्या देण्यात आल्या. याआधी देखील २० खुर्च्या व आवश्यक भांडी संस्था पुरवली आहेत. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवश्याम तिवारी यांनी अध्यक्षता केली, तर संस्थेचे संस्थापक व मुख्य मार्गदर्शक डॉ. राधेश्याम तिवारी आणि ज्येष्ठ पत्रकार व आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच, श्रीकांत पांडेय, इंद्रमणी दुबे, हरीशंकर तिवारी यांसह मनोज चतुर्वेदी, सुभाषचंद्र दुबे, रत्नेश दुबे, उमेश सिंह आणि कमलाकांत त्रिपाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे महासचिव नागेंद्र मिश्रा यांनी केले, तर प्रमोद तिवारी यांनी आभार प्रदर्शन केले. बस्तीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला.