मुंबई – मुंबईतील सात रेल्वे स्टेशनची नावे बदलण्यासंदर्भात प्रस्ताव मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत मांडला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर ही रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात येतील. मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने काही महिन्यांपूर्वीच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. यामध्ये मध्य रेल्वेवरील २, पश्चिम रेल्वेवरील २ आणि हार्बर रेल्वेवरील ३ स्थानकांची नावे बदलण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. यानंतर आता मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये १) मरीन लाईन्सचे नाव- मुंबादेवी, २) चर्नी रोडचे नाव – गिरगाव, ३) कॉटन ग्रीनचे नाव- काळाचौक, ४) डॉकयार्डचे नाव – माझगाव, ५) किंग सर्कलचे नाव- तीर्थनकर पार्श्वनाथ, ६) करी रोडचे नाव – लालबाग, ७) सँडहर्स्ट रोडचे नाव – डोंगरी या स्थानकांचा समावेश आहे.