आज वेस्ट इंडिज किंवा कॅरेबियन बेटांवरील बार्बाडोस येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये टी-२० वर्ल्डकपची फायनल होते आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख…
प्रिय रोहित,
तू काही मला ओळखत नाहीस. पण त्याने काय फरक पडतो? मी तुला ओळखतो आणि म्हणून मी तुला प्रिय म्हणूच शकतो. भारतीय संघासाठी जे काही केलंयस, करतोयस ते पाहून माझ्यासारख्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचा तू कधीच लाडका झालायस…
आज वाटलं, तुला सांगून टाकावं. रोहित शर्मा किंवा हिटमॅन एक क्रिकेटर आणि एक व्यक्ती म्हणूनही माझ्यासारख्या खूप जणांना प्रचंड आवडतो. मुंबईकर क्रिकेटरनं बॅट्समन म्हणून टीम इंडियात गेल्यावर लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये आधी मिडल ऑर्डरला खेळायचं. नंतर हळूच ओपनिंगला जायचं, हा सुपरहिट होण्याचा फॉर्म्युला आहे काय? असावा बहुतेक. आधी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने हेच केलं, रोहित, तूही नेमकं तेच केलंयस.
पण खरंच, रोहित तू जे काही केलंयस, करतो आहेस ना ते जमणं नक्कीच सोपं नाही. बॅट्समन म्हणून नाही आणि कॅप्टन म्हणून तर नाहीच नाही. सहाव्या नंबरवरून ओपनिंगला आल्यापासून तू एकदम वेगळ्या ग्रहावरून आल्यासारखा खेळायला लागलास. तुझ्या बॅटिंगबद्दल बोलायला शब्द कमी पडू लागले, विशेषणं शोधली जाऊ लागली… पण त्या सगळ्यापेक्षा मोठा होता, तू दिलेला विश्वास! लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये रोहित शर्मा जगातल्या कुठल्याही बॉलरची, जगातल्या कुठल्याही टीममधल्या सगळ्या बॉलर्सची धुलाई करू शकतो, पिसं काढू शकतो… हा विश्वास. शॉर्ट पिच्ड बॉलिंगसमोर भारतीय बॅट्समनची बोलती बंद व्हायची, पण आला शॉर्ट पिच्ड बॉल की तू फेकलाच… जेवढा आपटलेला बॉल येणार तेवढ्याच लांब तुझी सिक्सर जाणार, हाही विश्वास.
ओपनिंग करू लागल्यापासून तुझ्या बॅटिंगची चमक डोळे दिपवणारी होती. टीमची गरज म्हणून तू अगदी टेस्टमध्येही ओपन केलंस. आणि तू खोऱ्यानं रन केलेस. त्याच वेळी टीममधल्या इतर खेळाडूंचाही तू लाडका होत गेलास, सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास बसत गेला… एक दिवस तू कॅप्टन होणं मग अगदी साहजिकच होतं.
आता तू खूप वर्षांपासून कॅप्टन आहेस. भरपूर मॅचेस जिंकलोयत आपण. आयसीसी ट्रॉफीच काय ती राहिलीये. अहमदाबादमध्ये आपण फायनल हरलो, तिथपर्यंत आपण प्रत्येक मॅच जिंकलो होतो. आणि एक कॅप्टन म्हणून एकापेक्षा एक सरस मॅचविनर खेळाडू पुढे आणणारा कॅप्टन म्हणूनही तू नेहमीच लक्षात राहशील. २०२४मधल्या टी-२० वर्ल्डकपची फायनलही आपण खेळतोय. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, गतविजेत्या इंग्लंडला हरवून आपण फायनलमध्ये गेलोय. त्यातही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा आपण चुकता केलेला हिशोब सगळ्यांना विशेष सुखावतोय…
पण या सगळ्यातही तुझं मैदानावरचं वावरणं एकदम कूल असतं, फक्त बॅट हातात असली तर तू हिटमॅन असतोस. नाही तर एकदम फॅमिलीमॅन. खेळाडू हक्काने तुला मिठी मारतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर तुझ्याबद्दलचा आदरही स्पष्ट दिसत असतो. आता आजकाल आलेल्या स्टंपमाइकमुळे तु मैदानात ज्या ओव्या गातोस त्या जनतेलाही ऐकू जातात. पण त्याची रील्स बघताना खरं तर हसायला येतं, तुझं कौतुकही वाटतं. तुझ्या शिवराळपणामागची जिंकण्याची तळमळ सहजच लक्षात येते.
तुझं चाहत्यांना भेटणं, त्यांच्याशी आपलेपणानं बोलणं… तू बॅटिंगला आल्यावर तुझ्या पत्नीनं कायम क्रॉस फिंगर्स ठेवणं, तुझं आणि तुझ्या लाडक्या लेकीचं बाँडिंग… अरे तू इतका मोठा क्रिकेटर वैगरे वाटतच नाहीस रे… तू सगळ्यांना एकदम आपल्यातला, आपल्या जवळचाच कुणी तरी वाटतोस. म्हणूनच कदाचित रोहित शर्माचे फॅन्स सगळ्या वयोगटातले दिसतात… पुढे सरसावत लाँगऑन, मिडविकेटवरच्या सिक्सर, पॉइंट, मिडऑफवरच्या बाउंड्री, कव्हर ड्राइव्हज किंवा खरं तर तू मारलेला कुठलाही फटका जसा आम्हाला आवडतो, तसाच हा फॅमिलीमॅनही आम्हाला आवडतो.
अरे हो, तुझ्या विसराळूपणाचेही बरेच किस्से आहेत. तू काहीही विसरू शकतोस म्हणे… बॅटिंग कशी करायची हे मात्र विसरत नाहीस, हे बरंय. अर्थात तुझ्यामुळे अनेक बॉलर्स बॉलिंग कशी करायची विसरलेत म्हणे… असो.
रोहित, तुझ्या टीमला वर्ल्डकप जिंकता आला किंवा नाही तरी मला काहीच फरक पडत नाही. अर्थात टीम इंडियाने जिंकावं असं सच्चा क्रिकेटप्रेमी म्हणून वाटणारच. पण फक्त जिंकणं हेच सर्वस्व नसतं ना… तुझ्या शब्दांत सांगायचं तर प्रोसेसही महत्त्वाची असते.
तू आम्हाला आनंद देण्याची ही प्रोसेस अशीच सुरू राहो…
शुभेच्छा.
दिनार पाठक.