नवी दिल्ली – लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर उद्या (1 ऑगस्ट) रोजी लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या ‘महासंचालक’ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हवाई दलात एअर मार्शल पदावर बढती मिळाल्यानंतर साधना यांना हॉस्पिटल सर्व्हिसेस (सशस्त्र दल) चे महासंचालक बनवण्यात आले होते. एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणाऱ्या साधना या हवाई दलातील दुसऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी आहेत.
याआधी त्यांना एअर फोर्स ट्रेनिंग कमांड बंगळुरू हेड क्वार्टरमधून दिल्लीला प्रमोशनल ट्रान्सफर देण्यात आले होते. त्यांचे पती केपी नायर हे 2015 मध्ये डीजी ऑफ इन्स्पेक्शन आणि फ्लाइट सेफ्टी या पदावरून निवृत्त झाले. अशाप्रकारे, साधना आणि केपी नायर हे एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणारे देशातील पहिले जोडपे ठरले आहेत.
लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांनी त्यांचे शालेय शिक्षण सेंट मेरी कॉन्व्हेंट (प्रयागराज), लोरेटो कॉन्व्हेंट (लखनऊ) नंतर तेजपूर, गोरखपूर, कानपूर आणि चंदीगड अशा विविध ठिकाणच्या शाळांमध्ये घेतले. पुढे त्यांनी पुण्याच्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर डिसेंबर 1985 मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झाल्या. या व्यतीरिक्त त्यांनी फॅमिली मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे. तर एम्स, नवी दिल्ली येथे 2 वर्षांचा प्रशिक्षण कार्यक्रमही सुद्धा पूर्ण केला आहे. तसेच सेवा बजावत असताना स्वित्झर्लंडमधील स्पीझ येथे स्विस सशस्त्र दलांसह इस्रायली संरक्षण दलांसोबत सीबीआरएन युद्ध आणि लष्करी वैद्यकीय नीतिशास्त्राचा अभ्यास केला आहे. साधना सक्सेना नायर या एअर मार्शल झालेल्या दुसऱ्या महिला अधिकारी होत्या. त्यांच्या आधी एअर मार्शल पद्मा बंदोपाध्याय यांनी हा मान मिळवला होता.
तीन पिढ्यांनी सैन्य दलात बजावली सेवा
लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांचा विवाह एअर मार्शल के.पी. नायर यांच्याशी झाला. साधना सक्सेना यांची मुलगी आणि बहीण डॉक्टर आहेत. तर मुलगा हवाई दलात फायटर पायलट (फ्लाइट लेफ्टनंट) म्हणून तैनात आहे. त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांनी गेल्या सात दशकांमध्ये सैन्य दलात सेवा बजावली आहे. साधना यांचे वडील आणि भाऊही भारतीय हवाई दलात डॉक्टर होते.