महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता?

0

मुंबई – गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात गरज भासल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत दिले होते. राज्यातील विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला असते. त्यामुळे २६ नोव्हेंबर रोजी विधानसभा बरखास्त झाली तरी संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात निवडणूक घ्यायची झाल्यास नियोजित वेळेत नवी विधानसभा अस्तित्त्वात न आल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बरेच दिवस सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात एकूण 30 जागांवर महाविकास आघाडी, तर अवघ्या 17 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला होता. त्यामुळे महायुतीला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले होते. विधानसभा निवडणुकीतही संभाव्य पुनरावृत्ती होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती. यापैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या योजनेनुसार 21 ते 65 वयोगटातील महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. 14 ऑगस्टपासून या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती. मात्र लगेच दोन महिन्यांत निवडणूक झाल्यास या योजनांचा महायुतीला पुरेसा प्रचार करणे शक्य नाही. ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तसेच योजनेचे आणखी किमान दोन-तीन हप्ते तरी महिलांच्या बँक खात्यात जमा होणे आवश्यक आहे. त्याआधीच आचारसंहिता लागू झाली तर मोठा खोळंबा होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीची घोषणा विलंबाने केली जाऊ शकते.

मागील 15 वर्षांपासून म्हणजेच 3 विधानसभा निवडणुकींच्या वेळी महाराष्ट्रातील निवडणूक ही हरियाणाबरोबरच झाली होती. मात्र यंदा दोन्ही राज्यांची निवडणूक वेगवेगळ्या वेळी होईल हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट झालं. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तारखा जम्मू-काश्मीरमधील मतदान पूर्ण झाल्यावरच जाहीर केल्या जातील, असं केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी सांगितलं. तसेच झारखंड विधानसभा निवडणुकीसोबतच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech