मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या जन्मदिनाचे औचित्य साधून गोरेगाव येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव, संपर्क नेते मुंबई सिद्धेश कदम यांनी या शिबिराचे आयोजन केले.
हे शिबिर सन्मित्र क्रीडांगण, गोरेगाव (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले होते. नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. डोळे तपासणी, मोफत चष्मा वाटप, महिलांचे आजार, कर्करोग तपासणी, बालरोग, दंत काळजी, मधुमेह, रक्तदाब आणि हृदयरोग तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, औषधोपचार आणि ईसीजी तपासणी, सीबीसी तपासणी आणि रक्तदान शिबीर अशा विविध आरोग्याशी संबंधित तपासण्या आणि उपचारांचा समावेश होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती : या महत्त्वपूर्ण उपक्रमाला माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार प्रकाश सुर्वे, भाऊसाहेब चौधरी, किरण पावसकर, अमेय घोले, शिवसेना नेत्या मीना कांबळी, मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे यांनी उपस्थित राहून या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विशेष मत : याप्रसंगी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “महाआरोग्य शिबिर हा लोककल्याणासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे. आरोग्य हे प्रत्येक नागरिकाच्या जीवनात मूलभूत भूमिका बजावते. अशा उपक्रमांमधून समाजातील गरजू लोकांना मोफत आणि उत्तम वैद्यकीय सेवा मिळणे आवश्यक आहे.”
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया : “अतिशय चांगला आणि लोककल्याणकारी उपक्रम सन्माननीय नेते रामदासजी कदम यांच्या विचारांबरोबरच सिद्धेश कदम यांनी उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते. या शिबिरामुळे अनेक नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय मदत मिळाली.” असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या. कार्यक्रमाचे विशेष संयोजन : नगरसेवक शंकर हुडारे, दिंडोशी विभागप्रमुख लालसिंग राजपुरोहित, वैभव भराडकर, स्वप्रिल टेंबवलकर, अल्ताफ पेवेकर, ज्ञानेश्वर सावंत, वैषवी घाग, प्रियांका आंबोळकर, शिल्पा वेळे, विशाखा मोरये, पूनम वैद्य यांनी या उपक्रमाचे विशेष संयोजन केले.