मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. उद्या मंगळवारी, ११ फेब्रुवारी दिल्लीत माजी केंद्रीय मंत्री आणि दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी स्थित नवीन महाराष्ट्र सदनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ५ लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आणि पद्मभूषण राम सुतार यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दिल्लीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती आयोजकाकडून देण्यात आली. कार्यक्रमाच्या पूर्वी मराठी अभंगांसाठी प्रसिद्ध सरहद च्या शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाचा तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.