पुणे – पैसे द्यायचे, कार्ड खरेदी करायचे. त्याची मुदत संपेपर्यंत ते तुम्हीही वापरू शकता, मित्राला देऊ शकता. महामेट्रोने पुण्यातील मेट्रो प्रवासासाठी असे एक कार्ड नुकतेच सुरू केले. महामेट्रोचे पुण्यातील प्रवासासाठीचे हे तिसऱ्या क्रमाकांचे कार्ड आहे.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी ही माहिती दिली.
याआधी मेट्रोची विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी पास कार्ड व दुसरे पुणे स्मार्ट कार्ड अशी दोन कार्ड आहेत. ही दोन्ही कार्ड काढण्यासाठी प्रवाशांना आपली सर्व माहिती (केवायसी) महामेट्रोला द्यावी लागते. तिसरे कार्ड घेताना मात्र कसलीही माहिती द्यावी लागणार नाही. कार्ड खरेदी करण्यासाठी कोणतेही कागदपत्र लागणार नाहीत. १०० रुपये अधिक जीएसटी १८ टक्के असे एकूण ११८ रुपये जमा केल्यानंतर कार्ड मिळेल. त्यात एकावेळेस ३ हजार रुपये ठेवता येऊ शकतात. कार्डची मुदत ५ वर्ष आहे. पैसे संपले की त्यात ते पुन्हा टाकता (टॉप अप) येतात. मेट्रो अॅप किंवा मेट्रो स्थानकांवर असलेल्या ग्राहक सुविधा केंद्रांमधून हे कार्ड खरेदी करता येईल.