– देशात औद्योगिक क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात
पुणे : महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य असून, देशातील सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तळेगाव येथील हॅवमोर लोट्टे आईस्क्रीम उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सुनील शेळके, लोट्टे समूहाचे अध्यक्ष डोंग बीन शीन, रिपब्लिक ऑफ कोरियाचे भारतातील राजदूत शेंग हो ली, उद्योग विभागाचे सचिव पी अनबलगम, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू, माजी आमदार बाळा भेगडे, हॅवमोर आईस्क्रीम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोमल आनंद आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दावोस मधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचा दबदबा होता. अनेक गुंतवणुकीचे करार या ठिकाणी करण्यात आले. विविध उद्योजकांशी चर्चा करुन, त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत, राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करीत आहोत. दोनच दिवसांपूर्वी मैत्री कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले. या पोर्टलवर उद्योगासाठी आवश्यक असणारी सर्व व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. Ease of doing business या धोरणावर शासनाचे काम सुरू आहे.
आपल्याला लहानपणी आईस्क्रीम खूप आवडायचे. एक महिना आईस्क्रीम फॅक्टरी मध्ये राहायला जावे असे वाटायचे, असे सांगत आज या प्रकल्पाचे उद्घाटन करताना ते बालपणीच्या आठवणीत काही क्षण रमले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोट्टे आईस्क्रीम उत्पादन सुविधांचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आईस्क्रीम प्रकल्पाची पाहणी केली.