संपूर्ण मे महिन्यात ‘महाराष्ट्र महोत्सव’ साजरा करणार – तटकरे

0

मुंबई : शिवनेरीवर जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या देशाचे मानबिंदू असून रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक केला. छत्रपती संभाजी महाराजांचा अलौकिक असा पराक्रम आणि त्याचबरोबर शाहू – फुले – आंबेडकरांची सामाजिक समतेची वेगळी ओळख…साधूसंतांचा महाराष्ट्र… अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसकडून केले जात असून मुंबईत तीन दिवस कार्यक्रम झाल्यानंतर विदर्भाच्या भूमीमध्ये… (वर्धा येथील बापूजींच्या आश्रमात), मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर परिसरात… आणि त्यानंतर पुणे, नाशिक असा संपूर्ण मे महिन्यात संयुक्त महाराष्ट्राचा ६५ वा वर्धापन दिन ‘महाराष्ट्र महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे त्याच कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आज प्रदेश कार्यालयात बैठक पार पडल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी शिवाजीपार्कच्या ऐतिहासिक मैदानावर १ मे १९६० रोजी स्वीकारला आणि याच १ मे २०२५ रोजी राज्याच्या स्थापनेला ६५ वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्राचा हा ६५ वा वर्धापन दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस नियोजन करत असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी बलिदान दिले त्यांची आठवण… संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तेजोमय पध्दतीने केली… अनेक शाहिरांनी दिलेले योगदान… विदर्भाच्या नागपूरचा ऐतिहासिक करार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी केल्यानंतर सहभागी झाला तो विदर्भ…निजामाच्या राजवटीतील मराठवाडा परिसर महाराष्ट्रात सहभागी झाला. अशा अनेक गुणवैशिष्ट्यांसह गेली ६५ वर्ष महाराष्ट्राने गौरवशाली वाटचाल केली. अशा या महाराष्ट्राच्या सर्वदूर विभागातील त्या – त्या ठिकाणच्या संस्कृती… विचार आणि या सर्वांनीच दिलेले योगदान याची व्यवस्थित आखणी करण्यात आली आणि तीन दिवस मुंबईमध्ये हा कार्यक्रम केला जाणार आहे. त्याची रुपरेषाही ठरवण्यात आल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ या विभागातील निमंत्रित अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, आमदार राजू नवघरे, आमदार विक्रम काळे, आमदार संजय खोडके, आमदार किरण लहामटे, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी,लहू कानडे, अभिजित मोरे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, योगेश शेलार, योगेश बहल, निशिकांत पाटील, दिग्विजय सुर्यवंशी, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, बाबासाहेब आसुर्लेकर, आदिल फरास, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, श्रीमती सुरेखाताई ठाकरे, संतोष महात्मे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रशांत पवार, रविंद्र वासेकर आदी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech